पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा : अशोकतात्या पठारे सोशल फाउंडेशनतर्फे 300 मदत किटचे वाटप
जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य व वैद्यकीय किटसह मदतीचा हात; पूरग्रस्तांसाठी सामाजिक बांधिलकीची प्रेरणादायी मोहिम

पिंपरी-चिंचवड | आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोकतात्या पठारे सोशल फाउंडेशनच्या पुढाकाराने पूरग्रस्त नागरिकांसाठी 300 मदत किट तयार करण्यात आले आहेत. ही किट लवकरच पूरपरिस्थितीत अडकलेल्या भागात पाठविण्यात येणार असून, संकटग्रस्त नागरिकांना तातडीची मदत मिळवून देणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
या मदत किटमध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य तसेच प्राथमिक वैद्यकीय सामग्री यांचा समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी हा एक माणुसकीचा हात पुढे करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’, संग्राम जगतापांचे विधान; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
यावेळी बोलताना युवा नेतृत्व अशोक लक्ष्मण पठारे म्हणाले, “संकटाच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आम्ही फक्त एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.”
पूरग्रस्त भागांमध्ये प्रत्यक्ष मदत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची टीमही सज्ज असून, मदतीचा प्रत्येक किट योग्य त्या गरजूंना पोहोचवला जाणार आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा अधिक मजबूत होतो, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पूरग्रस्तांच्या वेदना आमच्या डोळ्यांसमोर आहेत. ही मदत म्हणजे केवळ वस्तू नव्हे, तर आमचा भावनात्मक आधार आहे. संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी माणुसकी आहे, आणि ती जोपासणं हे आमचं कर्तव्य समजतो.
– अशोक लक्ष्मण पठारे, युवा नेतृत्व




