‘दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा’, संग्राम जगतापांचे विधान; अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Ajit Pawar : दिवाळीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या एका विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. सोलापूर येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये बोलताना संग्राम जगताप यांनी केलेले विधानामुळे वाद पेटला आहे. यंदाच्या दिवाळीत खरेदी करताना ती फक्त हिंदूंकडूनच करा असे विधान त्यांनी केले आहे. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना संग्राम जगताप यांचे विधान चुकीचे असून पक्षाला ते मान्य नसल्याचे म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, “त्यांनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून कुठलाही खासदार-आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील, तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाहीत”
“खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सगळं सुरळीत होतं. पण आता काही लोकांनी, आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचं छत्र आपल्यावर राहिलं नाहीये, त्यामुळे आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सर्वांना पुढे घेऊन जाणारा आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – ‘ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार’; मंत्री प्रताप सरनाईक
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हाही त्यांना (संग्राम जगताप) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की मी यामध्ये सुधारणा करेन, पण सुधारणा करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची जी भूमिका आणि विचार आहेत ते पक्षाला मान्य नाहीत”.
संग्राम जगताप काय म्हणाले होते?
सोलापूर येथे हिंदू आक्रोश मोर्च्यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संग्राम जगताप म्हणाले होते की, मी दिवाळाच्या निमित्ताने सर्वांना विनंती करेन, जो-जो दिपावलीच्या निमित्ताने काहीखरेदी करेल, ती खेरेदी करताना आपला पैसा आणि नफा फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच मिळाला पाहिजे, अशा प्रकारची दिपावली आपण साजरी करावी, असे संग्राम जगताप म्हणाले होते




