आदिवासी बांधवांसाठी आणि आनंदवन-लोकबिरादरी प्रकल्पासाठी दीपावलीच्या भेटवस्तूंचे वितरण
शिक्षण विश्व: विद्यार्थी विकास मंडळाचा आदर्श उपक्रम

पुणे | एम.आय.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने यंदाही दीपावलीनिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत गडचिरोलीतील आदिवासी बांधव, हेमलकसा येथील डॉ. प्रकाश आमटे यांचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’ आणि डॉ. विकास आमटे यांचे ‘आनंदवन’ येथील कुटुंबियांसाठी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत ३३३ किलो साखर, २५ किलो गहू, २५ किलो तांदूळ, १०० पेन, १०० पेन्सिल, शालेय साहित्य, ११० साड्या आणि इतर कपडे भेट स्वरूपात ‘संस्कार प्रतिष्ठान’चे संस्थापक डॉ. मोहन गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रमुख प्रा. पल्लवी महागांवकर यांनी केले होते. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बाळासाहेब वाफारे आणि उपसंचालिका डॉ. अक्षदा कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा : कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत डॉ. बाळासाहेब वाफारे, डॉ. अक्षदा कुलकर्णी, रश्मी लाड, डॉ. संगीता बिराजदार, डॉ. वैशाली खर्डेकर, मयुरी बापट, विद्या चांदगुडे, सुषमा चाळके, डॉ. सुनैना शिवथरे, श्रद्धा पाठक, रेश्मा सोमवंशी, संगीता कुलकर्णी, दीपाली जोगदंड, सुमित्रा वीर, हर्षदा चांदोरकर, भाविक शहा आणि विष्णू गोरे यांनी साखर व धान्य खरेदीसाठी मदतीचा हात पुढे केला. तसेच इतर अनेक दात्यांनीही उदंड प्रतिसाद देत जीवनोपयोगी साहित्य भेट दिले.
“आपल्या छोट्याशा मदतीमुळे कोणाच्यातरी घरची दिवाळी गोड होईल, ही जाणीवच अत्यंत आनंददायी ठरली,” असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. उपक्रमात सहभागी सर्वांना सामाजिक उत्तरदायित्व निभावल्याचा समाधानकारक अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण करणारा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय ठरतो.
सामाजिक जाणीवेचा आदर्श…
विद्यार्थी विकास मंडळाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक जाणीवा जागृत करत सहकार्य, दातृत्व आणि संवेदनशीलतेचे सुंदर उदाहरण समाजासमोर सादर केले आहे. तरुण पिढीने अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याने “दिवाळी केवळ रोषणाईची नव्हे, तर दिलांमध्ये प्रकाश पेरण्याची संधीही असते” हे अधोरेखित झाले.




