सोसायटीधारकांची ठाम भूमिका : “आम्हाला पाणी नाही; तर प्रचारासाठी ‘एन्ट्री’सुद्धा नाही!”
मिशन महापालिका निवडणूक : लोटस नंदनवन सोसायटीची आक्रमक भूमिका, हंडा मोर्च्याचा इशारा

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
“पाणी नसेल तर प्रचारासही नो एन्ट्री!” असा थेट इशारा देत मोशीतील लोटस नंदनवन सोसायटीने आता आंदोलनाची हाक दिली आहे. मुसळधार पावसाच्या सरी सुरु असतानाही, या सोसायटीतील रहिवाशांना दररोज चार ते पाच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. गेली पाच वर्षे हेच चालू आहे, आणि आता सहनशक्तीचा बांध तुटला आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे शेकडो वेळा तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ढिसाळ, नियोजनशून्य आणि उदासीन कारभारामुळे नागरिकांच्या मूलभूत गरजांवरही गदा येत आहे.
पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी फेडरेशनचे अध्यक्ष श्री. संजीवन सांगळे यांनी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्री. चेतन देवरे यांना थेट सोसायटीत आणून वस्तुस्थिती दाखवली. पाहणीनंतर चेतन देवरे यांनी, “दोन-तीन दिवसांत नियमानुसार पाणी मिळेल” असे आश्वासन दिले, मात्र अशा आश्वासनांचे आतापर्यंत कुठलेही फलित न दिसल्यामुळे नागरिक आता चिडले आहेत.
“धरणे तुडुंब भरली, पावसाचा जोर कायम, आणि तरीही आम्हाला पाणी नाही? हे कसले स्मार्ट सिटी मॉडेल?” असा संतप्त सवाल सोसायटीधारकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पाणी नसेल, तर पुढाऱ्यांना नो एन्ट्री!
लोटस नंदनवन सोसायटीतील नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “जर पुढील चार-पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला सोसायटीमध्ये प्रचारासाठी येऊ दिले जाणार नाही.”
हा निर्णय एका सामूहिक बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयाला संपूर्ण सोसायटीचा पाठिंबा आहे.
हंडा मोर्च्याचा इशारा…
चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या नेतृत्वाखाली, पाणीपुरवठा बंद झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा नेण्याचा इशारा देण्यात आला आहे. महिलांचा सहभाग ठळक असणार असून, या आंदोलनात हजारोंच्या संख्येने रहिवासी सहभागी होणार आहेत.
“पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून गाजवले जात असले तरी काही भागांत लोकांना पावसाळ्यात सुद्धा पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागतं हे दुर्दैवी आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर हंडा मोर्चा निघणारच आणि कोणत्याही पुढाऱ्याला निवडणुकीत सोसायटीत पाय ठेवू दिला जाणार नाही.”
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन.




