भगवद्गीतेतून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची पेरणी”- विनायक भोंगाळे
शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मिडीयम येथे आंतरशालेय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा संपन्न

पिंपरी चिंचवड : भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सार सामावलेले आहेत. सामाजिक जडणघडण करताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून भगवद्गीता विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून रुजवल्यास चांगल्या आदर्शवत समाजाची जडणघडण यातून होईल असे मत गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी मांडले.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल येथे चिन्मय मिशनच्या वतीने आंतरशालेय भगवद्गीता पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्था अध्यक्ष विनायक भोंगाळे बोलत होते. भोंगाळे यांच्या पुढाकारातूनच ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक विचारांबरोबरच समाज मूल्यांची रुजवणूक व्हावी या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली.
हेही वाचा – मुकेश अंबानी– गौतम अदानी इंधन विक्रीसाठी एकत्र
या स्पर्धेमुळे शाळेमध्ये भगवद्गीतेच्या ओव्यांनी भारलेले, शांत व सात्विक असे वातावरण निर्माण झाले होते. एकूण २०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी भगवद्गीतेतील विविध अध्यायांचे पठण करीत आत्मिक समाधान प्राप्त केले. विद्यार्थ्यांना गीतेच्या अध्यायांची माहिती मिळावी व त्यातून जीवनमूल्यांची जाणीव व्हावी, असा या उपक्रमाचा हेतू होता.
स्पर्धेसाठी परीक्षण राजश्री पुरंदरे, दीपा देशपांडे, माधुरी आल्हाट, तनिष्क अल्हाट आणि सायली संत यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांना भगवद्गीतेतील शिकवणी दैनंदिन जीवनात कशी अमलात आणावी याविषयी मार्गदर्शन केले. जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाताना गीतेतील तत्वज्ञान कसे उपयोगी पडते, याचा उहापोहही त्यांनी केला.
या प्रसंगी व्यवस्थापकीय संचालिका कविता कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, विपणन अधिकारी शैलेंद्र सिंग, मुख्याध्यापक जोतिबा सुरवसे, उपमुख्याध्यापिका प्रिया नेवाळे, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भगवद्गीतेबद्दल आदर व आत्मियता निर्माण झाली असून, अशा उपक्रमांनी त्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो, असे प्रतिपादन उपस्थितांनी व्यक्त केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
—





