Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग रचना ‘‘जैसे थे’’,  भाजपासाठी अनुकूल अन्‌ राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल!

‘‘चाणक्य-रणनितीकार’’ यांचे प्रयत्न विफल : प्रभाग रचनेतील हस्तक्षेपाला प्रशासनाची ‘‘केराची टोपली’’

पिंपरी-चिंचवड | अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष शरद पवार गट यांच्यासाठी प्रतिकूल चित्र तयार झाले आहे. कारण, 2017 मध्ये जशी प्रभाग रचना आणि प्रभाग क्रमांक होते, तसेच जसेच्या तसे कायम ठेवण्यात आले आहेत. किरकोळ अपवाद वगळता कोणताही बदल न करता ही रचना अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण, तर राष्ट्रवादीत ‘‘कहीं खुशी कही गम’’ अशी स्थिती आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली असून, सदर प्रारूप अधिसूचना आज जाहीर करण्यात आली. दरम्यान नागरिकांना 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. प्रभाग रचना महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे.

आयुक्त शेखर सिंह ठरले ‘सिंग इन किंग’

प्रभाग रचनेच्या प्रक्रियेमध्ये महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ दिला नाही. अनेक दबाव, शिष्टमंडळं, नकाशे आणि राजकीय ‘सुपारीबाज’ यांना दूर ठेवत त्यांनी प्रशासनाची बाजू खंबीरपणे सांभाळली. त्यामुळे, या बाबतीत ते ‘सिंग इन किंग’ ठरले आहेत.

प्रभाग रचना अन्‌ राष्ट्रवादीचा भ्रमनिरास

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि काही चाणक्य आणि राजकीय रणनीतीकारांनी प्रभाग रचना बदलण्यासाठी मुंबई-पुणे अशा तीन-चार बैठका घेतल्या. नेत्यांकडे आणि अधिकाऱ्यांकडे फेऱ्या घातल्या. इच्छुक उमेदवारांच्या सोयीने प्रभाग ठरावेत यासाठी कागदपत्रे, नकाशे यांची चांगलीच जंत्री मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील मोठ्या उत्साहाने पाठपुरावा करण्यात आला. मात्र, या सगळ्या हालचाली निष्फळ ठरल्या आणि राष्ट्रवादीतील रणनितीकारांना अक्षरशः भ्रमनिरासाला सामोरे जावे लागले.

भाजपासाठी इतिहासाची पुनरावृत्ती?

राजकीय समीक्षकांच्या मते, 2017 प्रमाणेच रचना कायम राहिल्यामुळे, भाजपाला पुन्हा एकदा बहुमताने सत्तेवर येण्याची प्रबळ शक्यता आहे. मागील वेळेस ज्या रणनीतीतून भाजपाने यश मिळवले होते, तीच मांडणी या निवडणुकीसाठीही वापरता येईल, असा सूर भाजपाच्या गोटात आहे. महायुतीतील घटक पक्ष वेगळे लढल्यास भाजपाचे पारडे जड राहणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, प्रभाग रचना निश्चित केली आहे. मात्र, वाढलेला मतदार हा सुशिक्षीत आणि शहरी भागात असल्यामुळे भारतीय जनता पार्टी ‘‘क्लिन स्विप’’ मारण्यासाठी आता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक रिंगणात उतरेल, असाही दावा केला जात आहे.  निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच भाजपा आघाडीवर असल्याचे संकेत या घडामोडींनी दिले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य विरोधकांची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PDF वाचण्यासाठी क्लिक करा: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप प्रभाग रचना नकाशा प्रसिद्ध

 

 PCMC_draft_2-8-25 (1)

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button