निगडी-पिंपरी मेट्रो कामात ५२ झाडे तोडण्याचा आरोप; ठेकेदारांवर फौजदारी कारवाईची मागणी
भाजप चिटणीस सचिन काळभोर यांची आयुक्तांना विनंती – पर्यावरण संवर्धन मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मेट्रो अधिकाऱ्यांना आवर घालावा

पिंपरी : निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामादरम्यान निगडी परिसरात ५२ झाडे तोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, मेट्रो रेल्वे अधिकारी ठेकेदारांच्या मार्फत झाडे तोडत आहेत. हे थांबवून संबंधित ठेकेदारांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा. विशेष म्हणजे, पिंपरी पोलिस स्टेशन परिसरातील ५२ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे, ज्यास त्वरित आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा : सामाजिक विषमता दूर करण्याची जबाबदारी युवा पिढीवर; डॉ. वंदना बोकील
शहरात सध्या महापालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. अशा वेळी मेट्रो प्रकल्पाच्या कामात झाडांची तोड होत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंती काळभोर यांनी केली.
त्यांनी स्पष्ट केले की, शहराच्या हिरवाईचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि विकासकामे करताना पर्यावरणीय समतोल बिघडणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.





