ताज्या घडामोडीराष्ट्रिय

ट्रम्प यांचा भारताविरुद्ध सूडाग्नी !

डोनाल्ड ट्रम्प यांनी उगवला भारताचा सूड : अतिरिक्त करामुळे भारताची निर्यात घटण्याची शक्यता, भारतासाठी चिंतेची बाब..

न्यू यॉर्क / नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली आहे. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी सुरूच ठेवली असल्याचा बदला म्हणून ट्रम्प यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. याला आता भारत कसे प्रत्युत्तर देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिकेची घोषणा, भारत अडचणीत

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेले दोन दिवस धमक्या दिल्याप्रमाणे पंचवीस टक्के अतिरिक्त कर वाढवून भारताला पुन्हा दणका दिला आहे. अमेरिकेने हा निर्णय घेताना म्हटले आहे की, भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी अमेरिकेने भारतावर पंचवीस टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता अमेरिकेचा एकूण कर पन्नास टक्के झाला आहे. ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

अतिरिक्त कर २१ दिवसांत लागू..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला अतिरिक्त कर २१ दिवसांच्या आत लागू होणार आहे. म्हणजेच दि. २७ ऑगस्ट २०२५ पासून हा कर लागू होणार आहे. मात्र, या तारखेपूर्वी भारतातून बाहेर पडलेल्या वस्तू दि. १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी अमेरिकेत पोहोचल्या तर त्या वस्तूंवर हा कर आकारला जाणार नाही.

काही वस्तूंवर सूट मिळण्याची शक्यता

विशेष म्हणजे हा कर इतर सर्व शुल्क आणि करांव्यतिरिक्त असणार आहे. मात्र, काही विशेष प्रकरणांमध्ये यात सूट दिली जाण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांपूर्वीच भारतावर कर वाढवण्याची धमकी दिली होती. एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली, तर कर आणखी वाढवला जाईल. आता ट्रम्प औषध आयातीवरील कर २५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा कर असू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा –  लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता कधी मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

आधी लावला होता २५ टक्के कर..

या आधी अमेरिकेने दि. २९ जुलै रोजी भारतावर २५ टक्के कर लावल्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत, असेही विधान केले होते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. आता आणखी कर वाढल्याने भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे.

रशियन तेलाचा मोठा खरेदीदार

भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, अनेक युरोपीय देशांनी रशियासोबतच्या व्यापारावर बहिष्कार टाकला होता. अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर बंदी घातली होती. मात्र, भारत आणि चीनसारख्या आशियाई देशांनी रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. भारत अजूनही रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. त्यामुळे अमेरिकेने भारतावर हा कर लादला आहे.

पाकिस्तानला झुकते माप..

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात भारताबाबत ‘डूक’ धरण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली असून झुकते माप दिले आहे. गेले तीन-चार महिने ट्रम्प ही भारताची डोकेदुखी बनले असून नरेंद्र मोदी यांनी दोस्तीचा पुढे केलेला हात ट्रम्प यांनी स्वीकारला, पण वारंवार घुमजाव वरून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे.

नरेंद्र मोदी यांची बैठक..

भारताला अडचणीत आणणारे मुद्दे हाती घेऊन आणि तशा पद्धतीचे फासे टाकून भारताला कोंडीत पकडण्याचा डाव अमेरिकेने आखला आहे. यातून आता भारत कसा बाहेर पडतो आणि अमेरिकेचा दबाव झुगारून लावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ज्येष्ठशी सल्लामसलत केली. भारत हा डगमगणारा देश नाही. मोदींनीही प्रहार करून अमेरिकेला जेरीस आणावे, असे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

पुतीन यांच्याशी डोवाल यांची चर्चा..

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त कराबाबत चर्चा केली. भारताला आर्थिक संकटात टाकण्याचा अमेरिकेचा कट असून त्यातून तोडगा कसा काढायचा, हा या चर्चेतील मुख्य विषय होता. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर च्या पार्श्वभूमीवर आणि भारताच्या कडक धोरणावरदेखील या नेत्यांमध्ये बैठक झाली. अमेरिका हे पाकिस्तानला झुकते माप देत असून तो प्रश्नही कसा सोडवायचा याबाबत डोवाल यांनी पुतीन यांच्याशी संवाद साधला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button