प्रभाग क्र. 11 मधील रस्त्यांची दुरवस्था; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष!
विधायक पुढाकार: राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची तातडीने खड्डेमुक्तीची मागणी

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. 11 अंतर्गत येणाऱ्या पूर्णानगर, शिवतेजनगर, कृष्णानगर, फुलेनगर, सेक्टर-20, घरकुल, नेवाळे वस्ती, अजंटानगर आणि भीमशक्तीनगर या भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून, नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दुचाकीस्वार यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाणही वाढले असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण सर पाडुळे यांनी महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात जाऊन क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्यासाठी लिखित निवेदन सादर केले. त्यांनी प्रशासनाला यासंदर्भात तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली.
हेही वाचा : सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
पाडुळे यांनी सांगितले की, “रस्त्यांची ही परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.” निवेदनाची गंभीर दखल घेत ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी स्थापत्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सर्वेक्षण करून तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच या प्रभागातील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत महत्त्वाची असून, लवकरात लवकर या रस्त्यांचे नूतनीकरण व खड्डेमुक्तीचे काम सुरू होईल, अशी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रभाग क्र. 11 मधील रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली असून, पावसामुळे ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून हे रस्ते खड्डेमुक्त करावेत, हीच आमची प्रमुख मागणी आहे.
– अरुण पाडुळे, अध्यक्ष, पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठाण.





