पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला; ऑपरेशन सिंदूरवर लोकसभेत राजनाथ सिंह यांची माहिती

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या गदारोळानंतर अखेर दुपारी दोन वाजल्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेला सुरुवात झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेचा प्रारंभ करत भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले आणि पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ६ ते ७ मेच्या रात्री भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले, ज्यामध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी, त्यांचे ट्रेनर आणि हँडलर मारले गेले. ही कारवाई केवळ दहशतवाद्यांविरुद्ध असून पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यात धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली होती. या अमानवी कृत्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांशी चर्चा करून निर्णायक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर थेट हल्ले करून त्यांचा नायनाट केला.
हेही वाचा – पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानातूनच आले कशावरुन? पी. चिदंबरम यांचं वक्तव्य
संरक्षण मंत्री यांनी असेही नमूद केले की, ही कारवाई एकतर्फी नव्हती. ऑपरेशननंतर पाकिस्तानने भारताच्या सैनिकी केंद्रांवर क्षेपणास्त्र आणि लांब पल्ल्याच्या हत्यारांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने हे हल्ले निष्फळ ठरवले आणि त्याला योग्य प्रत्युत्तर दिले.
१० मे रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील हवाईतळांवरील धावपट्ट्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवण्या करण्यास सुरुवात केली. सध्या ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्यात आले असले, तरी पाकिस्तानने पुन्हा काही आगळीक केल्यास ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
सभागृहात दिलेल्या या माहितीत त्यांनी सैन्याच्या यशस्वी कारवाईचा गौरव करताना सांगितले की, ही कारवाई आमच्या माता-भगिनींच्या पुसलेल्या कुंकवाचा बदला होता आणि भारतीय लष्कराने ती पूर्ण शौर्याने पार पाडली.





