राजकीय समीकरणात नव्या हालचाली? बीकेसीत फडणवीस-आदित्य ठाकरे भेटीची चर्चा

मुंबई : विधानपरिषद अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात सत्तेत सहभागी होण्याच्या ‘ऑफर’वरून रंगलेल्या मिश्किल चर्चेनंतर आता या चर्चेला अधिक ऊत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी मुंबईतील बीकेसी येथील पंचतारांकित ‘सोफिटेल’ हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे एकाचवेळी उपस्थित होते, अशी माहिती समोर आली असून, या दोघांमध्ये प्रत्यक्ष भेट झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
याआधी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. “उद्धवजी, तुम्हाला २०२९ पर्यंत काही स्कोप नाही. तुम्हाला इथे यायचं असेल, तर स्कोप आहे. आपण ते वेगळ्या पद्धतीने बोलू. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे,” असे वक्तव्य करत फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा जवळ करण्याचा संकेत दिला होता.
हेही वाचा – भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट
या ऑफरवर उद्धव ठाकरे यांनीही सौम्य प्रतिक्रिया देत, “सभागृहात या गोष्टी खेळीमेळीत झाल्यात आणि तशाच व्हायला हव्यात,” असे म्हटले. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी मिश्किलपणे, “ऑफर दिली, स्वागताला आलो,” असे सांगून वातावरण हलकंफुलकं ठेवलं.
या पार्श्वभूमीवर शनिवारी दोन्ही नेत्यांची एकाच ठिकाणी उपस्थिती नोंदवल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. याआधीही विधानपरिषदेच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अनौपचारिक भेट झाली होती. त्यावर फडणवीस यांनी, “कोणी कोणाला भेटलं म्हणजे लगेच युतीसाठीच भेटलं असं नाही,” असे स्पष्ट केले होते.




