ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

कर्नाटकातील गृहकलहात, भाजपा पोळी भाजणार ?

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्यामध्ये आता खुर्चीसाठी गृहकलह सुरू आहे. शिवकुमार हे गप्प असले तरी सिद्धरामय्यांना केव्हाही ते उचलून टाकू शकतात. आता, या गृहकलहामध्ये विरोधी भारतीय जनता पार्टी पोळी भाजून घेणार का ? हा खरा चर्चेचा विषय आहे.

शिवकुमार यांच्यावर सगळे अवलंबून..

शिवकुमार हे काँग्रेस मधील क्रमांक दोनचे नेते आणि उपमुख्यमंत्री असले तरी कर्नाटकात जेव्हा काँग्रेसची सत्ता आली, तेव्हा ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. शिवकुमार हे कर्नाटकात अतिशय लोकप्रिय असून सभागृहात काँग्रेसच्या १३८ आमदारांपैकी शंभर आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, असे काँग्रेसचे नेते सांगतात. हा गट अलगद बाजूला काढला, तर भाजपाच्या समर्थनावर ते सत्तापालट करू शकतात, हे लक्षात घ्यायला हवे !

निवडणूक हरण्याचा पराक्रम..

काँगेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटकातील विधान सभा निवडणूक जिंकली. ती घटना खर्गे यांच्या दृष्टीने तसेच काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. त्यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सलग निवडणूक हरण्याचा पराक्रम काँग्रेसने केला होता. मात्र, आता कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात सुरू असलेला राजकीय संघर्ष आता राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चांपर्यंत पोहोचला आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रातील पहिला “वेस्ट टू वंडर वर्ल्ड” थीम पार्क पिंपळे सौदागरमध्ये!

काँग्रेसची बिकट वाट वहिवाट !

गेल्या काही दिवसांपासून बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी काँग्रेस हायकमांड सक्रीय झाली असून पक्षाचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांना आमदार आणि नेत्यांची भेट घेण्यासाठी बेंगळुरूला पाठवण्यात आले आहे. हा दौरा केवळ संघटनात्मक सिंहावलोकनाचा भाग म्हणून नव्हे, तर संभाव्य नेतृत्व बदल किंवा मंत्रिमंडळ फेरबदलाचा एक भाग मानला जात आहे. सुरजेवाला यांच्यावर पक्ष फुटू न देण्याची मोठी जबाबदारी आहे. वेळप्रसंगी काँग्रेसची सत्ता कायम ठेवून तेच डी. के. शिवकुमार यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी केंद्राला सुचवू शकतात !

अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद!

कर्नाटकातील निवडणुकीनंतर २०२३ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन होताना दोन्ही नेते अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद वाटून घेतील यावर एकमत झाले होते, असा शिवकुमार गटाचा दावा आहे. ऑक्टोबर २०२५ पर्यंत सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतर शिवकुमार यांची पाळी येईल. मात्र, सिद्धरामय्या गटाने अशा कोणत्याही कराराचा स्पष्ट इन्कार केला असून तो काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. सिद्धरामय्या हे काँग्रेसमधील एकमेव प्रभावी ओबीसी नेते असून अशा नेत्याला मध्यंतरी मुख्यमंत्रिपदावरून हटविणे, पक्षासाठी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरेल, असे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे मत आहे. त्यातच,सध्या काँग्रेस अंतर्गत असंतोष वाढत आहे. निधी वाटपाबाबत काही आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचे वेळीच निराकरण न झाल्यास त्याचा फटका संघटना आणि सरकार या दोघांनाही बसू शकतो.

शेवटचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे..

पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी थेट कोणत्याही बदलांची घोषणा केली नसली, तरी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक प्रकारच्या अटकळांना उधाण आले. हा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे. त्यांच्या च्या मनात काय चालले आहे, हे कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे हाती सापडेल त्या माहितीनुसार प्रत्येक जण तर्क करत सुटला आहे. खर्गे यांच्या वक्तव्याकडे दोन्ही गट आपापल्या परीने पाहत आहेत. शिवकुमार यांचे समर्थक याकडे संधी म्हणून पाहतात, तर सिद्धरामय्या गटाला त्यात कोणताही ठोस बदल होताना दिसत नाही. कर्नाटक काँग्रेस सध्या दोन वेगवेगळ्या गटात विभागली गेली आहे, हे मात्र निश्चित !

जातीय विरुद्ध आर्थिक समीकरण

पहिला गट, जो सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावर ठेवण्याच्या बाजूने आहे आणि दुसरा जो शिवकुमार यांना संधी देण्याची मागणी करत आहे. दोन्ही नेत्यांची आपापली ताकद आहे. एकीकडे सामाजिक समीकरणांवर सिद्धरामय्या यांची पकड आहे, तर दुसरीकडे पक्ष संघटना आणि निधीवर शिवकुमार यांचे वर्चस्व आहे. या लढ्याचा सर्वात मोठा परिणाम पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहन करावा लागला. आताही अंतर्गत परिस्थितीवरून संघर्ष संपलेला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

तडजोड का उघडपणे बंड..

दोन्ही गटांमधील रस्सीखेच येत्या काळात तडजोड किंवा उघड बंडाला कारणीभूत ठरू शकते. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील संघर्ष काँग्रेससाठी कठीण परीक्षा बनला आहे. पक्षाने ते नीट हाताळले नाही तर कर्नाटक सरकारचे स्थैर्य धोक्यात येऊ शकते आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या ऐक्याच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. हे राजकीय युद्ध कसे संपते, हे आगामी काळात काँग्रेस नेतृत्वाचे कौशल्य आणि दोन्ही नेत्यांच्या प्रगल्भतेवर अवलंबून असेल.

भाजपा हात धुवून घेणार..

काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाजपाची घोषणा नेहमीचीच आहे. त्यात कर्नाटक सारखे मोठे राज्य काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे तेथील प्रत्येक घडामोडीवर भाजपाचे बारीक लक्ष असणार. त्यात शिवकुमार हे नाराज असल्यामुळे त्यांच्याभोवती एव्हाना मोठे जाळे टाकलेले असणार ! त्यांचा गट अलगद बाजूला काढून भाजपाच्या पाठिंब्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकते, याची कल्पना एव्हाना त्यांना दिली असणार ! आणि मुख्य म्हणजे ‘ऑपरेशन लोटस’ काय असते हे कर्नाटकला चांगलेच माहीत आहे, त्यामुळे तापल्या तव्यावर भाजपा पोळी भाजणार, असेच राजकीय निरीक्षकांना सध्या वाटत आहे !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button