एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
वन अर्थ वन हेल्थ संकल्पनेतून योग दिन उत्साहात साजरा
पुणे : वन अर्थ वन हेल्थ या संकल्पनेतून एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे योगाच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्याचे महत्त्व अधोरेखित करणे, तसेच विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नियमित योगाभ्यासासाठी प्रेरित करणे हे होते.

कार्यक्रमात समर्पण ध्यान केंद्राच्या योग प्रशिक्षक ऋता कलवार यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, श्वसन तंत्र आणि ध्यान यांची प्रात्यक्षिके दाखवून सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी योगाभ्यासामुळे मिळणाऱ्या सकारात्मक मानसिक बदलांबरोबरच, “प्रत्येक जीव परमात्म्याशी जोडलेला असतो” या तत्त्वज्ञानावरही प्रकाश टाकला. भारताच्या प्राचीन योग परंपरेचे जागतिक आरोग्य आणि मानसिक समतोल साधण्यामध्ये असलेले योगदानही यानिमित्ताने अधोरेखित करण्यात आले.
हेही वाचा – कुदळवाडीतील नागरिकांनी घेतला योग साधनेचा अनुभव
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) प्रमुख प्रा. अरविंद वागस्कर, विद्यार्थी विकास मंडळाच्या प्रमुख प्रा. पल्लवी महागांवकर आणि क्रीडा विभाग प्रमुख श्री. राजेश कडलग यांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफरे आणि उपसंचालिका प्रा. अक्षदा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी अशा १५० पेक्षा अधिक सहभागींनी सक्रिय सहभाग नोंदवून योग दिनाची भावना प्रत्यक्ष कृतीतून अनुभवली.




