इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचे आंदोलन

पिंपरी चिंचवड : दिवसेंदिवस इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढत आहे. सातत्याने नदी फेसाळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, शहराचे आरोग्य देखील प्रदूषित नदीमुळे बिघडत आहे. नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पिंपरी –  चिंचवड शहरातील नागरिकांनी रविवारी (दि. ४) मोई फाटा येथील इंद्रायणी नदी काठावर
आंदोलन केले.

मोई फाटा येथे कुदळवाडी, चिखली परिसरातून वाहणारा रामझरा इंद्रायणी नदीला
मिळतो. आता या झर्‍याचे गटारीत रूपांतर झाले असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये बांधकामाचा राडारोडा, प्लास्टिक कचरा आणि दूषित पाणी असे पाहायला मिळते. मागील तीन महिन्यांपूर्वी पिंपरी – चिंचवड महापालिकेने कुदळवाडी आणि चिखली परिसरातील भंगार व्यावसायिकांमुळे इंद्रायणी नदीचे पाणी दूषित होत असल्याचे कारण देत भंगार व्यावसायिकांवर कारवाई केली. कारवाई होऊन तीन महिने उलटले तरी देखील प्रदूषित पाणी कमी झालेले नाही.

हेही वाचा –  सोमवारी जाहीर होणार बारावीचा निकाल, कुठल्या वेबसाईटवर पाहता येणार निकाल?

त्यामुळे प्रशासनाने नदी प्रदूषणाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळते. श्री क्षेत्र देहू, श्री क्षेत्र आळंदी अशी महत्वाची धार्मिक स्थळे इंद्रायणीच्या काठावर आहेत. दरवर्षी लाखो भाविक, वारकरी इथे येत असतात. हे वारकरी अशा प्रदूषित इंद्रायणी नदीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत असून भविष्यात आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. नदीमध्ये मिसळणार्‍या नाल्यांच्या पाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडले जात आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ करावी. नद्यांमध्ये मिसळणार्‍या नाल्यांचे पाणी पूर्णपणे शुद्ध करून नदीमध्ये सोडावे.

नदीचा नैसर्गिक प्रवाह अखंडित ठेवावा, अशा मागण्यांसाठी रविवारी आंदोलन करण्यात आले. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हातात पोस्टर घेऊन घोषणा देत इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करण्याची मागणी केली. नदीकाठावरील झाडांची कत्तल, जैवविविधतेचा नाश आणि पावसाळ्यात येणार्‍या पुराचा धोका याकडेही आंदोलकांनी लक्ष वेधले. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नद्यांवर नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये नद्यांमधील प्रदूषित पाण्याला शुद्ध करण्याला प्राधान्य देण्याऐवजी सुशोभीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. तसेच, नद्यांमध्ये भराव घालून नद्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिक काही महिन्यांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा वाढत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *