ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

नीलमताईंचे शिंतोडे कसले? ‘मातोश्री’ खाली जणू सुरुंगच!

एका मुलाखतीमध्ये शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ खाली जणू सुरुंगच लावला आहे. त्यांनी शिंतोडे उडवले किंवा त्याच स्वतः भ्रष्ट आहेत असे म्हणणाऱ्यांचे आता पेव फुटेल. पण, त्यांनी वर्मी बसणारा घाव घातला आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाला रक्तबंबाळ करून टाकले आहे. कोणत्याही आणि कोणाच्याही खुलाशाचे मलम त्यावर आता इलाज करू शकत नाही!

दोन मर्सिडीज गाड्यांमध्ये सौदा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट आरोप केला आहे, की उद्धव ठाकरे यांच्या पक्षात दोन मर्सिडीज ‘मातोश्री’ वर पाठवल्या, की हवे ते पद मिळते, अगदी चौकशी न करता ते बहाल केले जाते. साहित्य संमेलनातील खुलेआम प्रकट मुलाखतीत कॅमेऱ्यासमोर त्यांनी केलेल्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजणे हे क्रमप्राप्तच आहे. किंबहुना खळबळ उडावी, म्हणूनच नीलमताईंनी हा थेट वार केला असावा.

शिवसेनेचा इतिहासच देवाणघेवाणीचा

ज्यांनी शिवसेना जवळून पाहिली आहे, त्यांना हे असे आरोप नवीन नाहीत. शिवसेनेत आर्थिक देवाण-घेवाण जोरात चालते, हे प्रत्येक शिवसैनिकाला माहित आहे. यापूर्वी, अनेक वेळा अशा स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप झाले. अगदी शाखाप्रमुख, नगरसेवकपदापासून ते खासदारकीपर्यंत उमेदवारी देताना पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘डील’ होत असते, हे अगदी स्पष्टपणे नव्हे, पण डबक्या आवाजात अनेक जण सांगत असतात.

आज हा मुद्दा नीलम ताईंनी उघडपणे मांडला असला तरी यापूर्वी शिवसेनेचे मंत्री नितेश राणे यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा उत्पन्नाचा स्रोत काय, आणि ते अडीशे तीनशे कोटींचा बंगला कसा बांधू शकतात? हा प्रश्न उपस्थित केलेला आहेच. त्याला ठाकरे गटातील अनेकांनी दुजोरा सुद्धा दिला आहे.

शिवसेनेत फूट पडली, वाभाडे सुरू..

पूर्वी शिवसेना एक होती त्यावेळी सर्व काही ‘तेरी भी चूप,मेरी भी चूप’ या न्यायाने सुरळीत सुरू होते. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि मोठा गट घेऊन ते बाहेर पडले. राज्याचे थेट मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मात्र शिल्लक सेनेने त्यांच्यावर आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. पन्नास खोके, भ्रष्ट आमदार गेल्यामुळे शिवसेना स्वच्छ झाली असे आरोप केले. गंमत अशी की ‘मातोश्री’ बरोबर एकनिष्ठ असताना एकनाथ शिंदे हेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक कमाई करून ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचवत होते, असा आरोप किंवा ही माहिती प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात घर करून बसली आहे. आता या शिवसेनेच्याच नेत्या म्हणजे नीलमताई !

ज्या घरच्या बोरी तेथीलच बाभळी !

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिल्लक सेना आणि एकनाथ शिंदे यांची ‘ओरिजनल’ शिवसेना यांच्यातच पदावरून आणि देवाण-घेवाणी वरून जुम्पल्यामुळे मूळ शिवसेना कशी असावी? याची कल्पना येऊ शकते. स्वतः नीलम ताई या उच्चशिक्षित आणि संविधानिक पदावर काम करत असल्यामुळे, त्या बेजबाबदार वक्तव्य कधीच करणार नाहीत. त्यामुळे, त्यांनी दोन मर्सिडीज चा विषय काढला.. अर्थात् त्यांनी म्हणताना दोन मर्सिडीज म्हटले असले तरी मोठी आर्थिक उलाढाल त्यांना अपेक्षित असावी! थोडक्यात काय, ‘मातोश्री’वर पैसे पोहोचवले नाहीत तर पद मिळत नाही असे शब्द त्यांना उच्चाराचे असणार !

शाखाप्रमुखाचा मोठा ‘रेट’..

एक गोष्ट नक्की आहे की ज्याने शिवसेना जवळून पाहिली आहे, त्याला या पक्षाचे आर्थिक गणित नक्कीच माहित असणार. शाखाप्रमुख म्हणून नेमण्याचा अमुक अमुक रेट, नगरसेवकासाठी ही रक्कम, आमदारकीसाठी अपेक्षा आणि खासदारकीसाठी सर्वात मोठी रक्कम दिल्याशिवाय पद मिळत नाही, हा आरोप यापूर्वी अनेकांनी केलेला आहेच. नीलमताईंनी त्या जखमेवरील फक्त खपली काढली आहे, एवढा सध्याचा अर्थ!

हेही वाचा  :  रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा; उपमुख्यमंत्री अजित पवार 

चारित्र्य हननासाठीच सर्व काही !

आता, नेहमीसारखा बेंडबाजा, शिवीगाळ, टोमणे आणि त्यांच्या अब्रूची लक्तरे बाहेर काढण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू होईल. वास्तविक, त्या ज्यावेळी मूळ शिवसेनेत होत्या, त्यावेळी तोंड बंद ठेवलेले सुद्धा आता चौफेर चारित्र्याचे ढोल बडवत बसतील. शिवसेनेतील त्यांची अनेक वर्षे, त्यांची आमदारकी सर्वांना मान्य होती. एवढेच काय एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला, त्यावेळी पण त्या चांगल्या होत्या. पण, आता त्यांनी केलेल्या आरोपाच्या मिरच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगल्याच झोंबल्या आहेत, आणि त्याचा प्रतिकार म्हणून नीलमताईंच्यावर अगदी खालच्या थराचे आरोप सुरू झाले आहेत.

राजकारणाचा थरच ढासळला !

उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमक हरामी केली असा आरोप केला आहे, तर सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना चारदा आमदारकी मिळाली, तर किती पैसा गोळा केला,याचा हिशोब द्यावा, अशी मागणी केली आहे. नीलमताई आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवार म्हणून विधान परिषदेत चारदा निवडून गेल्या. आता त्या उपसभापती देखील झाल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ वर किती मर्सिडीज गाड्या पाठवल्या याचा हिशोब द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केली आहे.

काहीतरी तथ्य असणारच..

भाजपाचे गिरीश महाजन यांनी देखील नीलमताई म्हणतात म्हणजे या आरोपात तथ्य असावे, असा दावा केला आहे. दरम्यान, आपण चारदा आमदार झालो. मात्र एकदाही काहीही पैसा मातोश्रीला दिला नाही, असा दावा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे, हे पण लक्षात घ्यायला हवे !

मूळ शिवसेनेबाबत नीलमताई यांनी जो आरोप केला, त्याबाबत इतरही अनेक शिवसैनिकांकडून कधी ना कधी, काही ना काही कानावर आले आहे. मात्र, हे फक्त शिवसेनेतच नाही, तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी जास्त प्रमाणात आहे, हे मान्य करायलाच हवे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी ज्यावेळी पुढे गेली, त्यावेळी काँग्रेसच्या इच्छुकांकडून अनुक्रमे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी प्रत्येकी पाच कोटी रुपये घेतल्याचे पत्र, त्या इच्छुकांनी थेट राज्यपालांना दिले होते, हा इतिहास ताताचा आहे.

पदासाठी पैसे दिले, तर चारित्र्याचे काय?

मात्र, ये थे प्रश्न असा पडतो, की कोणीही कार्यकर्ता एखादे पद मिळवायला आर्थिक देवाणघेवाण करीत असेल तर अशावेळी पद मिळाल्यावर तो आपले स्वच्छ चारित्र्य जपू शकेल याची खात्री काय? जेव्हा एखादे पद मिळवायला तो मोठी रक्कम देणार असेल,तर त्याच्या पुढल्या कार्यकाळात तो ती रक्कम किमान पाचपटीने तरी वसूल करणारच..

आज नीलमताई यांच्यासारख्या समाजवादी विचारसरणीतून पुढे आलेल्या एका कार्यकर्तीने परिणामांची पर्वा न करता असा बेधडक आरोप जाहीर मुलाखतीत करावा, ही बाब सर्वच राजकीय पक्षातील धुरिणांना विचार करायला लावणारी आहे, सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. राजकारणातील हे विकृत स्वरूप आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडून थांबणार नाही, तर त्याला नैतिकतेची पेरणी करूनच नव्याने उभारणी घेणारे झाड लावावे लागेल, हे मात्र निश्चित !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group