प्रशासन आणि नागरिक सुसंवाद वाढीसाठी लोकशाही दिन कार्यक्रम

पिंपरी : नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून लोकशाही दिन राबविला जातो. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढीसाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. तसे परिपत्रक आयुक्त शेखर सिंह यांनी सामान्य प्रशासन विभागाला काढले आहे.
लोकशाही दिन अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पालिका अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशा चार महिन्यांचा कालखंड सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (२) यांच्याकडे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर यांच्या चार महिन्यांची जबाबदारी असेल. तर, अतिरिक्त आयुक्त (३) यांच्याकडे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी अशा चार महिन्यांचे अध्यक्षपद असेल.
नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख हे लोकशाही दिनाचे समन्वय अधिकारी असतील. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक तरतुदींचा अंतर्भाव करायचा असल्यास अथवा निर्णय घ्यायचे असल्यास त्याकरीता समन्वय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. लोकशाही दिनाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे, प्राप्त निवेदनावरील कार्यवाहीचे विविधस्तरावरील संनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांमार्फत आज्ञावली विकसीत केली जाणार आहे. समन्वय अधिकाऱ्यांमार्फत लोकशाही दिनाकरिताचे अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील.
हेही वाचा : ‘खंडणी मागाल तर मकोका लावणार’; अजित पवारांचा कडक शब्दात इशारा
तसेच, अर्ज नागरी सुविधा केंद्राच्या बाहेर लावण्यात येतील. समन्वय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक महिन्याला कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ निश्चित करून त्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे कळवले जाणार आहे.
अर्जाच्या प्रती नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करण्याची जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांची असेल. अर्ज करताना तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८ यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे अर्जदाराने १५ दिवस आधी अर्ज दोन प्रतीत पाठवावा. लोकशाही दिनाच्या दिवशी अर्ज स्वीकारला जाणार नाही. सारथी व जनसंवाद सभेत तक्रार दाखल केल्यास तसेच अशा तक्रारीचे निराकरण झाले नसल्यास अशा तक्रारी लोकशाही दिनामध्ये स्वीकारल्या जातील.
महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी वा निवासी उपजिल्हाधिकारी, वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिकेच्या विभागांचे विभागप्रमुख तसेच प्रशासकीय आवश्यकतेनुसार लोकशाही दिन समन्वयक अधिकाऱ्यांनी आमंत्रित केलेले अधिकारी या लोकशाही दिनास हजर असतील.
सारथी व जनसंवाद सभेत तक्रार केल्यास टोकन क्रमांक अथवा संदर्भ क्रमांकाची प्रत अर्जासोबत सोडावी. दाखल तक्रारींबाबत संबंधित विभागाकडून अथवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तराची प्रत जोडावी. तसेच, लोकशाही दिनाकरीता निश्चित केलेले स्थळी आणि वेळी अर्जदाराने अर्जांसह उपस्थित राहावे. विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस आधी दोन प्रतींत समन्वय अधिकाऱ्यांकडे जमा करावा. प्रत्यक्ष लोकशाही दिनी अर्ज सादर करता येणार नाही. प्रकरण थेट महापालिका कार्यालयाशी संबंधित असेल तर लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहील, असे आवाहन पालिकेने केले आहे.





