देवाभाऊ, तुस्सी ग्रेट हो !

शिल्लक शिवसेना म्हणजेच उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे, साहजिकच सर्वांसाठी चर्चेचा विषय आहे ! कारण, गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी म्हणजे देवाभाऊंबाबत बोलताना एकही शिवी शिल्लक ठेवली नसेल. त्यांची प्रत्येक पत्रकार परिषद किंवा जाहीर सभा ही देवाभाऊंवर शिव्यांची लाखोली वाहण्यासाठीच होती की काय ? असा बहुतेकांना प्रश्न पडलेला असायचा. अर्थात् त्याला पार्श्वभूमी देखील तशीच होती.
आपण थोडेसे पार्श्वभूमीकडे वळू या.. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती होती आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी वेगळी चूल मांडली, आणि मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर संसार थाटला. नंतर, व्हायचे तेच झाले..जे पेरले तेच उगवले ! भाजपला वाऱ्यावर सोडून त्यांनी गद्दारी केली खरी, पण त्यांच्याच पक्षात मोठी मंडळी होऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट फुटला आणि भाजपाशी हात मिळवणी करून थेट सत्तेवर बसला ! त्या संपूर्ण घडामोडी मागे भाजपा म्हणजेच पर्यायाने देवेंद्र फडणवीस असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा रोख फडणवीस यांच्याकडे असणार यात नवल काहीच नव्हते. पण भाषेला कुठेतरी मर्यादा हवी. उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट कमरेखाली वार करण्याचे सुरुवात केली आणि आतापर्यंत त्यांची ती शिवराळ भाषा अजूनही सुरू आहे.
आता, निवडणुकांमध्ये जनतेने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे स्पष्ट केले आणि देवेंद्र फडणवीस हे कसे बरोबर होते हेही दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांचा गट सपशेल तोंडावर पडला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे लोटांगण घातले असून त्यांची नागपूरला जाऊन भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले असले तरी त्यामागील अनेक गुप्त करणे जनतेला माहित आहेत, सर्व उघड्या डोळ्यांनी पाहणारी जनता मूर्ख नक्कीच नाही, हे लक्षात घ्यायला हवे !
आठवा, उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची दहा मिनिटे का होईना भेट घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन’ ने सुरु झालेला प्रवास भेटीसाठी वेळ मागून भेट घ्यायला येईपर्यंत आला.. देवेंद्रजींनी कधीही पोकळ धमक्या दिल्या नाहीत, की दंड सरसावत आगपाखड केली नाही.. शांतपणे थंड डोक्याने गेम केला.. शरद पवार असोत अथवा उद्धव ठाकरे.. एकाच वेळी तीन चार राजकीय शत्रूंना शिंगावर घेऊन प्रसंगी धोबीपछाड मारणारा राजकारणी म्हणून देवेंद्रजींची वेगळी ओळख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम राहील ! कोणे एके काळी ‘बामनाचं पोरगं’, ते आता आता पर्यंत ‘टरबुज्या’ म्हणून झालेली अवहेलना, हलाहल समजून पचवून, ब्राह्मणद्वेषी राजकारणावर मात करून देवेंद्रजी ‘अठरापगड जातींच्या कणखर, पवित्र देशा महाराष्ट्रा देशा’ चा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाला आहे आणि त्याच ‘बामनाच्या पोराला’ राजकीय आयुष्यातून उठवण्याची भाषा करणारे आज विनवण्याकरून भेटीची वेळ मागत आहेत ! आगामी काही दिवसात शरद पवार ती सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे भेटायला आले तर नवल वाटायला नको!
जे देवेंद्र फडणवीस यांना जवळून ओळखतात, ते नक्की सांगतील, की हा देवेंद्र यांचा स्वभाव नाही! ‘मी माझा बदला पूर्ण केला’ या त्यांच्या वक्तव्यानंतर ‘मी असं म्हणायला नको होतं’ असं म्हणणाऱ्या देवेंद्र यांच्या मनांत एक मुख्यमंत्री म्हणून विधान परिषदेच्या साध्या आमदार उद्धव ठाकरेंना भेटतांना काय भावना आल्या असतील? एकच भावना आली असेल, ‘एक वर्तुळ पूर्ण झालं, चला कामाला लागू यात’!
या मधल्या काळात त्यांनी देवेंद्रजींचा अगदी शेलक्या भाषेत उद्धार केला हे सर्वांना माहित आहे. फडतूस म्हणाले, कलंक म्हणाले, हाकलून द्या, लाथा घाला वगैरे शब्दांचा उद्धार झाला. खंजीर, गद्दार, औरंगजेबाची औलाद येथ पासून ते भिकारड्यापर्यंत सर्व शब्दांचा पाढा वाचला गेला. उद्धव ठाकरे यांचा पारा दिवसेंदिवस चढत होता, तर देवेंद्रजी हे सर्व शांतपणे पाहत होते. कदाचित, त्यांना कल्पना होती की महाराष्ट्रातील जनता सूज्ञ असून ती आपल्याच पाठीशी उभे राहणार आहे.. शेवटी त्यांना अपेक्षित तो दिवस उगवला.. उद्धव यांनी भेटण्यासाठी वेळ मागितली.. एकाची अभिमानाने छाती फुगली तर दुसऱ्याने लोटांगण घातले, हे जनतेने पाहिले.
नागपूरमधील भेटीने राजकीय चर्चा!
मूळ सांगायचा मुद्दा हा, की गेल्या अडीच वर्षांपासून ज्यांनी एकमेकांकडे सरळ तोंडाने बघितले नाही, ज्यांच्यावर अगदी टोकाची भूमिका घेत टीका केली, त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांनी नागपुरात भेट घेतली. उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात भेट घेण्यासाठी पोहोचले, अन संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनात ते पोहोचले. आपल्या हातातील बुके देऊन फडणवीसांचे अभिनंदनही केले. त्यानंतर, हात जोडून ते निघाले असता देवेंद्र फडणवीसांनी या बसा.. असे म्हणत बसण्याचा आग्रह केला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी देखील खाली बसून त्यांच्यासोबत 6 ते 7 मिनिटे चर्चा केली. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये, सोफ्यावर बसून दोन्ही नेते चर्चा करताना दिसत आहेत. या भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, ही सदिच्छा भेट होती, दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठीची ही भेट होती, असे सांगण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकली आहे . त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची कामे होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसे आले ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत, असे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले असले तरी सुषमा अंधारे यांनी नेहमीच फडणवीस हे शिवसेना पक्ष फुटीतले खलनायक असल्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, याबाबत भुवया उंचावण्याचे काही कारण नाही. देवेंद्र फडणवीस हे फक्त एक व्यक्ती नाहीत तर एका राज्य संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना भेटायला उद्धव ठाकरे गेले होते.
कोणाला काय म्हणायचे ते म्हणोत.. पण बुद्धिबळाच्या या सारीपटावरील बाजी देवेंद्रजी फडणवीस यांनी मारली आहे, सर्व विरोधकांना गलितगात्र करून त्यांनी सत्ता पटकावली आहे. आणि बहुमत सुद्धा एवढे आहे की पुढील पाच वर्षे त्यांना तसूभरही धोका नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे आलेले हे फडणवीस नावाचे वादळ पुढील कित्येक वर्षे असेच घोंगावत राहणार आहे आणि विरोधकांचा पाला पाचोळा करणार आहे, हे नक्की! सध्या एवढेच म्हणावे वाटते की देवा भाऊ, तुस्सी ग्रेट हो!





