चिखली-कुदळवाडी आग दुर्घटना: पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांचे नियमित सुरक्षा लेखापरीक्षण करा !
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी; आयुक्तांना लेखी पत्र, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर खासदार करणार घटनास्थळाची समक्ष पाहणी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिखली कुदळवाडी यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी भीषण आग लागण्याची दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशामक दल केंद्र उभारणी, नियमितपणे सुरक्षा लेखापरीक्षण, कचरा व्यवस्थापन व प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केल्या आहेत. दरम्यान संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर खासदार समक्ष घटनास्थळाची पाहणी करणार असून तत्पूर्वी शासनाने येथील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील डॉ. कोल्हे यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी या भागांमध्ये वारंवार आगीच्या दुर्घटना होत आहेत. दोनच दिवसांपूर्वी या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात काही भंगार दुकानांना आग लागली. यामध्ये पन्नासहून अधिक भंगाराची गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांसहित शहराच्या पर्यावरण आरोग्याला ‘झळ’ बसत आहे.
यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना पत्राद्वारे काही सूचना केल्या आहेत. या पत्रात खासदारांनी म्हटले आहे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील चिखली, कुदळवाडी मधील भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या दुर्घटना अत्यंत गंभीर व संवेदनशील असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अशा प्रकारची दुर्घटना कशी घडली यासंदर्भात निःपक्ष पणे चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अधिकृतपणे व्यापार करणाऱ्या करदात्या व्यावसायिकांवर या दुर्घटनेत झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक आहे. चिखली कुदळवाडी व पालिका कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा अश्या प्रकारची आग लागण्याची दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशामक दल केंद्र उभारणी, नियमितपणे सुरक्षा लेखापरीक्षण, कचरा व्यवस्थापन व प्रशिक्षण आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासंदर्भात नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
निपक्षपातीपणे चौकशी करा…
खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे चिखली कुदळवाडी परिसरात भंगार गोडाऊनला आग लागण्याची दुर्घटना ही एक आपत्ती असून या घटनेचे राजकीय भांडवल न होऊ देता, कोणत्याही प्रकारच्या राजकीय दाबावला बळी न पडता, कोणत्याही विशिष्ट समुदायाला हेतुपूर्वक लक्ष्य न करता निःपक्षपणे चौकशी व तपास करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी.




