सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवार भडकले; म्हणाले..

Ajit Pawar | सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या या विधानावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सदाभाऊ खोत यांना सुनावले आहे. शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीच अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
सदाभाऊ खोत यांनी जतमधील सभेत बोलताना शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली. पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे? असं सदाभाऊ खोत म्हणाले.





