शिवसेना, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचा मोठा गट फुटणार? कारणही आलं समोर

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील अनेक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या नंतर आता महाराष्ट्रात आणखी एका पक्षाचा मोठा गट फुटणार असल्याचं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
प्रतापराव जाधव म्हणाले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामळे काँग्रेसचा मोठा गट लवकरच महायुतीत सामील होईल.
हेही वाचा – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात, कंटेनर पलटी झाल्याने कारचा चक्काचूर
वरिष्ठ लोकांना डावलून विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या कनिष्ठ (ज्युनिअर) माणसाला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने काँग्रेसमधील सगळे वरिष्ठ नेते अतिशय अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावं घ्यायची गरज नाही. संबंधित नेत्यांची नावं आपल्या सर्वांना माहीत आहेत. ते सर्वजण अतिशय अस्वस्थ झाले आहेत. ते योग्य निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात महायुतीत सहभागी होईल, असंही प्रतापराव जाधव म्हणाले.





