कार भाड्याने लावण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

कार भाड्याने लावण्याच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

कंपनीत कार लावून ठराविक भाडे दरमहा देण्याचे आमिष दाखवून कार घेतली. त्यानंतर ठरलेले भाडे आणि कार न देता फसवणूक केली. याबाबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 12 फेब्रुवारी 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 या कालावधीत राजमाता उड्डाणपूलाखाली भोसरी येथे घडला.

सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड), बाळासाहेब तानाजी थोपटे (वय 59, रा. भोसरी), अजय धुमाळ, कलीम शेख (दोघे रा. माजलगाव, जि. बीड), तेजस आल्हाट (रा. मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सागर साबळे आणि बाळासाहेब थोपटे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चैतन्य हनुमंत वाघ (वय 25, रा. कुरुळी, ता. खेड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मालकीची सेलेरिओ कार (एम एच 14 / जी यु 8251) ही कंपनीतील साहेब लोकांना ने आण करण्यासाठी टुरिस्टवर लावण्याचा बहाणा केला. त्याबदल्यात फिर्यादी यांना दरमहा २० हजार रुपये भाडे देण्याचे ठरले. आरोपींनी गाडी घेऊन गेल्यानंतर ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना भाडे दिले नाही. तसेच त्यांची कार देखील त्यांना परत केली नाही.

अॅड. थोपटे यांनी आरोपी सागर साबळे याच्या सांगण्यावरून सागर हा नोटरी करताना हजर नसताना देखील नोटरी करून घेतली. फिर्यादी आणि सागर यांची नोटरी रजिस्टरला सही न घेता फिर्यादी यांची फसवणूक केली.

अशाच प्रकारे आरोपींनी एम एच 14 / एच डब्ल्यू 3857, एम एच 14 / एच डी 3873, एम एच 14 / एच जी 7528 या कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून इतर लोकांच्या नोट-या करून त्यांना ठरल्याप्रमाणे पैसे न देता तसेच त्यांच्या कार परत न करता एकूण 20 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *