किम जोंग उन यांच्या बहिणीची बायडेन यांना धमकी

न्यूयॉर्क – उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग यांनी अमेरिकेला थेट धमकी दिली आहे. ‘तुमची झोप उडेल’ असा कोणताही निर्णय घेऊ नका, अशा शब्दांत किम यो जोंगने अमेरिकेला धमकावले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील अधिकारी टोकियो आणि सियोलमध्ये दाखल झाले असतानाच उत्तर कोरियाने हा इशारा दिल्याने दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
किम यो जोंग या किम जोंग उन यांच्या प्रमुख सल्लागार आहेत. त्यांनी अमेरिकेला इशारा देताना, ‘पुढील चार वर्ष तुम्हाला सुखाने झोपण्याची इच्छा असेल तर आम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करणारे कोणतेही पाऊल उचलू नका’, असे म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन उत्तर कोरिया आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जपान आणि उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त ते आशियात दाखल झाल्यानंतर लगेचच उत्तर कोरियाने अमेरिकेला हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोरियाने यासंदर्भातील भूमिका एका पत्रकाद्वारे स्पष्ट केली.
दरम्यान, अमेरिकेचे हे दोन्ही मंत्री टोकियोमध्ये चर्चासत्रात सहभागी होतील त्यानंतर उद्या म्हणजेच बुधवारी ते सियोलमध्ये दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. उत्तर कोरियात अंतर्गत विषयांसंदर्भातील सर्व जबाबदारी संभाळणाऱ्या किम यो जोंग यांनी, उत्तर कोरियाला दक्षिण कोरियासोबत सहकार्य करावेसे वाटले नाही तर लष्करी तणाव समाप्त करण्यासंदर्भात २०१८ साली केलेल्या करारामधून बाहेर पडण्याचा निर्णयही आम्ही घेऊ शकतो, असे म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली समितीही बरखास्त करण्याची धमकी किम यो जोंग यांनी दिली आहे. ‘आम्ही दक्षिण कोरियासोबत असणाऱ्या आमच्या संबंधांवर नजर ठेऊन आहोत. जर त्यांच्या हलचाली आम्हाला उकसवणाऱ्या असतील तर आम्ही टोकाचे पाऊल उचलू’, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘ही संधी आम्ही अमेरिकेला इशारा देण्यासाठी वापरू इच्छितो असे सांगत उत्तर कोरियाने अमेरिका आम्हाला उकसवण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे’, असा टोलाही उत्तर कोरियाने लगावला आहे.
त्याचबरोबर किम यो जोंग यांनी, ‘जर त्यांना (बायडेन यांना) पुढील चार वर्षांसाठी सुखाने झोपण्याची इच्छा असेल तर त्यांच्यांसाठी हेच चांगले ठरेल की त्यांनी आम्हाला उकसवणारे निर्णय घेऊ नयेत. त्यांनी असे केले तर त्यांची झोप उडेल’, असे म्हटले आहे.





