सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा तुर्तास नाहीच; मुंबई आयुक्तांनी केलं स्पष्ट

मुंबई – दिवाळीनंतर मुंबईत कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. दिल्लीत तर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतोय. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, याकरता सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर टाकण्यात आला आहे. . बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एका मुलाखतीत बोलताना हे स्पष्ट केलं आहे.
मुंबईतील लोकल सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केली जात आहे. आवश्यक सेवेतील आणि महिलांसाठी लोकल सुरू केल्यानंतर आता सर्वसामान्यांनाही लोकलचे दरवाजे खुले करण्याचे नियोजन सरकारकडून सुरू आहे. मात्र, हा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली. मुंबईत वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर चहल यांनी चिंता व्यक्त केली आहे. महापालिका आयुक्त चहल म्हणाले,”मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. मात्र, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात येणार नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. जलतरण तलाव (स्वीमिंग पूल), शाळा आणि रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, आता या तिन्ही गोष्टी बंद राहतील. इतर ठिकाणावर सध्या कोणताही परिणाम होणार नाही,” असं आयुक्त चहल म्हणाले.




