कंपनीच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

वाडा : तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हद्दीतील रिजन्सी इस्पात या कंपनीच्या छतावरून पडून मयूर शांताराम शेलार (वय ४५) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (३ जून) घडली असून हा कामगार भिवंडी तालुक्यातील जांभिवली गावातील रहिवासी आहे.
तालुक्यातील खुपरी ग्रामपंचायत हद्दीत कुडूस-खानिवली रोडवर वसुरी गावालगत रिजन्सी इस्पात ही लोखंडाचे उत्पादन करणारी कंपनी असून या कंपनीच्या छताच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा कामगार चढला असता छताचा पत्रा तुटून हा कामगार खाली असणाऱ्या लोखंडी अँगलवर पडल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. खाली पडल्यानंतर लोखंडी अँगलचा मार डोक्याला लागल्याने या कामगाराचा मृत्यू झाला.
दरम्यान, बुधवारी (३ जून) जिल्हा व तालुका प्रशासनाकडून निसर्ग वादळाचा इशारा दिलेला असतानाही वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवस्थापनाने बेजबाबदारपणे सदर कामगारांना छताच्या दुरुस्तीची परवानगी दिल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.





