राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे ‘प्राणीप्रेम’; भटक्या जनावरांना महिनाभराचे खाद्य पुरवले!

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाच्या या संकटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे (पिंपरी विधानसभा) गोरगरिबांना सढळ हाताने मदत केली आहे. आता त्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांच्या अन्नाचा प्रश्न सोडविला आहे. लॉकडाऊनमुळे अशा प्राण्यांचे अतोनात हाल होत असताना एक महिना पुरेल एवढे खाद्य आमदार बनसोडे यांनी पुरविले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
शहरातील हॉटेल अथवा खानावळीतील उरलेल्या अन्नपदार्थांवर जगणाऱ्या मुक्या प्राण्यांना लॉकडाऊन मध्ये अन्न मिळणे मुश्कील झाले आहे. अन्न मिळत नसल्याने प्राण्याची केविलवाणी अवस्था होत आहे .या पार्श्वभूमीवर जनावरांना चारापाणी व भटक्या कुत्र्यांना अन्न देण्याचा उपक्रम याला पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मदतीचा हात दिला आहे. एक महिन्याचा खर्च जवळपास ९० हजार रुपयांची मदत आमदार बनसोडे यांनी केली आहे. हा उपक्रम राबवणारे आकांक्षा मिश्रा, राहुल पालांडे, सिद्धेश मेहेर, शशांक मिश्रा, सून्नू पणीवर, मितिषा सोनिगरा, श्रद्धा पाटील, अमर काटे यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हाती घेतला आहे. पुण्यातील औंध-रावेत बीआरटी रोड, पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी, चिखली स्पाईन रोड, यमुनानगर, तळवडे, किवळे, मोहननगर चिंचवड आदी भागातील मुक्या जनावरांना अन्न-पाणी देण्याचे कार्य अखंडितपणे सुरू आहे. शहरातील १२०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना ८२ किलो पेन्डीगेरी, ८० किलो पोहे असे सुमारे ९० हजार रुपये किंमतीचे डॉग फुड देत आहेत.
लॉकडाऊनच्या या संकटात पहिल्या दिवसापासून आमदार अण्णा बनसोडे गोरगरिबांच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध आहेत. कष्टकरी कामगार, रिक्षाचालक, अंगणवाडी सेविकांसह प्रत्येक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्यांनी मोफत पुरविले आहे. आता शहरातील माणसांसोबत प्राण्याची पण काळजी घेणारे एकमेव आमदार ते ठरलेत.





