#Coronolockdown:दिल्लीत मद्यावर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’, पेट्रोल-डिझेलचीही दरवाढ

नवी दिल्ली : ‘आम आदमी पक्षा’च्या नेतृत्वातील दिल्ली सरकारने मद्य आणि इंधनाच्या दरात घसघशीत वाढ केली आहे. दारुच्या किरकोळ दरावर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’ आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांनी गर्दी केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारपासून दिल्लीत उपकर लागू करण्याचा निर्णय घेतला. तर पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर ‘व्हॅट’ वाढवल्याने इंधनाचीही दरवाढ झाली आहे.
दिल्ली सरकारच्या आदेशानुसार, परवानाधारक मद्य विक्रेत्यांनी सर्व प्रकारच्या मद्यावर एमआरपीच्या 70% उपकर आकारायचा आहे. त्यामुळे राजधानीत दारुच्या किमतीत घसघशीत वाढ झाली आहे. आदल्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांनी दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. नियमांचं पालन होत नसल्यास दुकानमालक जबाबदार असतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलं होतं.
दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही केजरीवालांकडून वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 1.67 रुपयांनी, तर डिझेल तब्बल 7.10 रुपयांनी महाग झालं आहे.




