प्रा. मोरे प्रेक्षागृहाचा वाढीव खर्च, तब्बल 10 महिन्यानंतर ठेकेदाराला आठवला 58 लाखांचा हिशोब

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नुतनीकरणाच्या वाढीव खर्चाला स्थायी समितीने कार्योत्तर मान्यता देण्यात आली. यापूर्वी प्रेक्षागृहाच्या कामासाठी 17 कोटी 65 लाख 69 हजार 905 रुपयांचा खर्च केला असताना आता पुन्हा वाढीव कामाच्या खर्चापोटी 58 लाख 69 हजार रुपयांचा हिशोब पालिकेकडे राहिल्याचा साक्षात्कार ठेकेदाराला झाला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विलास मडिगेरी होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नुतनीकरण करण्यासाठी 18 कोटी 46 लाख 61 हजार 307 एवढ्या खर्चाची निविदा प्रसिध्द करण्यात आली. हे काम करण्याचे आदेश मे एस. जे. बिल्डकॉन यांना 11 मे 2018 रोजी देण्यात आले. कामाची मुदत 10 ऑक्टोबर 2018 पर्यंत ठेवली होती. या कामासाठी मे. किमया असो. यांची वास्तुविशारद आणि मे. जेनेसिस टेक्नोलॉजिस प्रा. लि. यांची प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. कामातील अडथळे समजून घेता 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली. काम पूर्ण होताच 18 मार्च 2019 रोजी ठेकेदाराला पालिकेने अंतिम बील अदा केले. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2018 रोजीचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम यशस्वी करण्यात आल्याचे स्थापत्य विभागाच्या विषयामध्ये नमूद आहे. मुळात कार्यक्रम आणि काम पूर्ण झाल्याची तारिख जुळत नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर संशय निर्माण होत आहे.
विकास कामांमध्ये प्रेक्षागृहातील खुर्च्या, आर्ट गॅलरीचे फर्निचर, जीआरसी कॉलम, इमारतीचे इलेव्हेशन, (पूर्व व उत्तर दिशा) याच्या परिमाणामध्ये, व्याप्तीनुसार वाढ झाली. डोबळ मानाने निविदेचा दर ठेकेदाराने 7.56 टक्के कमीने दिला होता. त्यामुळे कामाची व्याप्ती वाढल्याने तब्बल 9 महिन्यांनी ठेकेदाराला वाढीव खर्चापोटीच्या रक्कमेचा साक्षात्कार झाल्याचे समोर आले आहे. त्याने केलेली मागणी विचारात घेता वाढीव खर्चापोटी एकूण 58 लाख 69 हजार अदा करण्याच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.




