फेसबुकद्वारे विद्यार्थीनीला अश्‍लिल व्हिडीओ पाठविणाऱ्यास अटक

फेसबुकद्वारे विद्यार्थीनीला अश्‍लिल व्हिडीओ पाठविणाऱ्यास अटक

पुणे – महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून महिला असल्याचे भासवून एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीस अश्‍लिल व्हिडीओ, छायाचित्रे व मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या तरुणास सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सातारा येथील एका तरुणास अटक केली.

संदिप गणपत जाधव (वय 28, रा. जैतापुर, चिंचनेर, वंदन चिंचनेर, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाषाण येथे राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीने चतुःश्रृंगी पोलिस ठाणे व सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव याने फेसबुकवर एका महिलेच्या नावाने बनावट खाते उघडले होते. त्याद्वारे त्याने विद्यार्थीनीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. विद्यार्थीनीने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर त्याने तिला अश्‍लिल व्हिडीओ, छायाचित्रे पाठविण्यास सुरूवात केली. त्यानंतर विद्यार्थीनीच्या मेसेंजरवर अश्‍लिल मेसेज पाठविले. या प्रकारामुळे विद्यार्थीनीस मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होऊ लागला. अखेर या प्रकारास कंटाळून विद्यार्थीनीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यावेळी हा प्रकार साताऱ्यातील जैतापुर येथील संदिप जाधव या तरुणाकडून केला जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने साताऱ्यामध्ये जाऊन आरोपीस त्याच्या घरून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल व एक सीमकार्ड जप्त केले. आरोपीविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलिस कर्मचारी उमा पालवे, संतोष जाधव, शाहरुख शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फेसबुक, ट्‌विटर यांसारख्या सोशल मिडीयाद्वारे अनोळखी व्यक्ती या ओळखीच्या असल्याचे भासवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवितात. अशा फ्रेंड रिक्वेस्टचा स्विकार करु नये, त्यांना प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकरणांमध्ये कोणाबाबत काही घडले असल्यास त्यांनी तत्काळ सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *