ममता गायकवाड यांच्या मान्यतेतील विकास कामांचे आ. जगतापांच्या हस्ते भूमीपूजन

- माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा पाठपुरावा
- लिनिअर गार्डन, फुटबॉल टर्फ ग्राऊंड, व्यायामशाळेचे भूमीपूजन
पिंपरी, (महाईन्यूज) – वाकड परिसरातील लिनिअर गार्डन, फुटबॉल टर्फ ग्राऊंड, तालीम व व्यायामशाळा आदी विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज शनिवारी (दि. 3) करण्यात आले.
स्थायी समिती सभापती व नगरसेविका ममता विनायक गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज वाकड परिसरातील लिनिअर गार्डन, फुटबॉल टर्फ ग्राऊंड, तालीम व व्यायामशाळा या विकासकामांना गतवर्षी प्राधान्याने मान्यता देण्यात आली. ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आमदार जगताप यांच्या हस्ते आज भूमीपूजन समारंभ घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, युवा कार्यकर्ते संकेत चोंधे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पांडकर, पाटील, बशीर आबा, गायकवाड, मुकेकर, भालेकर, शेलार, कोळेकर, पवन भोसले, रमेश दिवेकर, ओव्हाळ आदी उपस्थित होते.
वाकड परिसरातील लिनिअर गार्डन, फुटबॉल टर्फ ग्राऊंड, तालीम व व्यायामशाळा अशी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने व महत्वकांक्षी विकासकामे होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या माजी सभापती ममता विनायक गायकवाड यांनी प्रयत्न केले आहेत. माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या “स्मार्ट डेव्हलपमेंट” या दुरदृष्टीतून प्रभागात ही विकासकामे राबविली जात आहेत. काही प्रलंबित विकास कामांना सुध्दा लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे.
ममता गायकवाड म्हणाल्या की, वाकड-पिंपळे निलख परिसरातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व पूर्वीपेक्षा अधिक व उत्तम विकासकामे करण्याच्या हेतूने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. गतकाळातील ही कामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यातील बरीच कामे मार्गी लागली आहेत. त्याचा नागरिकांना प्रत्यक्ष अनुभव येत आहे. “स्मार्ट डेव्हलपमेंट” ही दुरदृष्टी ठेवून वाकड-पिंपळे निलखच्या विकासात भर घालणारी विकासकामे केली जात आहेत.





