Breaking-newsपुणे

द्रुतगती मार्गावर जनावरे मोकाट

  • तुटलेल्या सुरक्षा जाळ्यांकडे दुर्लक्ष; वाहनचालकांना धोका

पिंपरी – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोकाट जनावरांचा सर्रास वावर होत असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. वेगवान वाहतुकीच्या या रस्त्यावर उघडपणे जनावरे दिसून येत आहेत. मार्गालगतच्या सुरक्षा जाळ्या ठिकठिकाणी तुटल्या असून, त्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याची सद्यस्थिती आहे. या दुर्लक्षामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे-मुंबईला जोडणारा यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग वेगवान वाहतुकीसाठी ओळखला जातो. किमान ८० कि.मी. प्रतितास वेगाची मर्यादा निर्धारित केली असली तरी, त्याकडे कानाडोळा करून या मार्गावर १४० कि.मी. किंवा त्यापेक्षाही अधिक वेगाने वाहने दामटली जातात. सुरक्षिततेच्या दृष्टीने सायकलस्वार, दुचाकी, रिक्षा, बैलगाडी आदींना महामार्गावर प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर जनावरांचा सर्रास वावर होत असल्याचे दिसून आले आहे.

गहुंजे ते लोणावळा दरम्यान अनेक ठिकाणी बैल, म्हैस,गाय, कुत्रे, मांजर आदींचा रस्त्यावर वावर आहे. मार्गालगत लावण्यात आलेल्या जाळ्या तुटलेल्या आहेत. काही ठिकाणी त्या चोरीला गेल्या आहेत. मार्गालगत गवत जास्त असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून तेथे जनावरे चरायला सोडलेली असतात. ही जनावरे थेट रस्त्यावर येऊ लागली आहेत. हा प्रकार अतिशय धोकादायक असूनही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.

वेगाने येणाऱ्या वाहनांसमोर जनावरे आल्याने यापूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगण्यात येते. चार महिन्यांपूर्वी अज्ञान वाहनाच्या धडकेने एक हरिण मृत्युमखी पडले होते. दोन वर्षांपूर्वी गहुंजे स्टेडियम जवळचा रस्ता ओलांडणारा एक बिबटय़ा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्युमुखी पडला होता. जनावरे मार्गावर सोडली म्हणून तळेगाव पोलिसांनी एकावर गुन्हाही दाखल केला होता.

‘आमच्या जीवाशी खेळू नका’

द्रुतगती मार्गाची देखभाल आयआरबी कंपनीकडे आहे. वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षिततेचे उपाय योजण्यात कंपनीने कुचराई करू नये, योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना महामार्ग वाहतूक पोलिसांनी कंपनीला वेळोवेळी दिल्या आहेत. तरीही अपेक्षित उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी आहेत. आमच्या जीवाशी खेळ करू नका, अशा शब्दात या मार्गाचा नियमित वापर करणाऱ्या वाहनस्वारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

द्रुतगती महामार्गाची देखभाल करणाऱ्या आयआरबी कंपनीला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर जनावरे येऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्यास, आवश्यक ठिकाणी जाळ्या लावण्यास आणि तुटलेल्या जाळ्या दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे.

– दत्तात्रय गाडवे, पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button