कृषी मालाला चांगल्या भावासाठी १० हजार गावांत स्मार्ट प्रकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; ग्रामविकासाला चालना मिळणार
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने थेट कंपन्यांना किंवा बाजारात विकता यावीत यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेला स्टेट ऑफ महाराष्ट्राज अॅग्रीबिझनेस अॅंड रुरल ट्रान्सफॉर्मेशन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून १० हजार गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने जागतिक बॅंकेच्या सहकार्याने हाती घेतलेल्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा आरंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरकार विविध कंपन्या, शेतकरी उत्पादक संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. वॉलमार्ट, अॅमेझॉन, महिंद्रा, पेप्सिको, टाटा रॅलिज, बिग बास्केट, पतंजली आदी नामवंत कंपन्यांचा सहभाग आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख, पदुम मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, जागतिक बॅंकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश अय्यर आदी उपस्थित होते.
प्राथमिक टप्प्यात राज्यातील १० हजार गावांमध्ये स्मार्ट प्रकल्प राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव-बाजारपेठ मिळवून देणे, या माध्यमातून कृषी तसेच ग्राम विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने स्मार्ट प्रकल्प निर्णायक ठरेल, असे फडणवीस म्हणाले.
कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) हे या प्रकल्पात भागीदार आहेत. स्मार्ट प्रकल्पात सुमारे २११८ कोटी रुपयांचा निधी गुंतविण्यात येणार असून त्यापैकी १४८३ कोटी रुपये निधीचा वाटा जागतिक बँक उचलणार आहे. राज्य सरकारतर्फे ५६५ कोटी रुपये तर व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशनमार्फत ७१ कोटी रुपये मिळणार आहेत.
जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद म्हणाले, भारतातील शेतकऱ्यांसह काम करण्यासाठी वर्ल्ड बँक उत्सुक आहे. भारतातील शेती ही उत्पादन आधारितऐवजी बाजारपेठ आधारित होणे गरजेचे आहे. यासाठी स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्ल्ड बँक सर्वतोपरी सहकार्य करेल.
वॉलमार्टमधून ३० हजार जणांना रोजगार
महाराष्ट्रातील तीन शहरांत सध्या वॉलमार्टचे स्टोअर सुरू असून एकूण १५ स्टोअरसाठी महाराष्ट्र सरकारसह करार केला आहे. एका स्टोअरमधून साधारण दोन हजार जणांना रोजगार मिळतो. आम्ही पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात ३० हजार जणांना रोजगार देऊ, ग्राहकांना रास्त दरात उत्पादने विकण्याबरोबरच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यावर आमचा भर असेल, असे वॉलमार्टचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिश अय्यर यांनी सांगितले.





