‘वायसीएम’च्या मानधन भरती प्रक्रियेची चाैकशी करा

सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हाॅस्पीटलमध्ये होणा-या मानधन तत्वावरील भरती प्रक्रियेत वशिलेबाजी, लाचखोरी, शिफारस तसेच नियम पायदळी तुडवित उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. त्या भरती प्रक्रियेची चाैकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत रेगडे यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयात एका मानधन आया (स्त्री कक्ष मदतनीस) पदावर दीड वर्षे कामावर गैरहजर असतानाही त्या महिलेला पुन्हा सेवेत सामावून घेतले आहे. सदरील भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेच्या अटी व शर्तीचा भंग करुन बदल केला आहे. तसेच डाटा एन्ट्री आॅपरेटर या पदासाठी पुर्वी शासनाच्या काॅम्प्युटर आॅपरेटर कोर्सची अट होती. पण अट वगळून टायपिंग परीक्षा उत्तीर्ण अशी नवीन अट घालून अनेक उमेदवारांना वारंवार नेमणूक दिली आहे. त्यामुळे सन 2014 पासून झालेल्या भरती प्रक्रियेची चाैकशी करुन संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.





