टेबल टेनिस स्पर्धा : अयहिकाच्या कामगिरीने मेव्हरिक्स संघाचे वर्चस्व

पुणे – अयहिका मुखर्जीने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखीन एका मानांकित खेळाडूवर सनसनाटी मात करताना आरपी-एसजी मेव्हरिक्स संघाला सिएट अल्टिमेट टेबल टेनिस पॉवर बाय केलॉगस स्पर्धेत महाराष्ट्र युनायटेड संघाविरुद्ध आघाडी मिळवून दिली.
पुण्याच्या शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या लढतीत 21 वर्षीय अयहिकाने जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या हॉंगकॉंगच्या ली हो चिंगला एमपावरजी चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात नमविले होते. आता तिने लिली झांगला 2-1(10-11, 11-5, 11-10) असे पराभूत केले. पहिली गेम गमावून देखील अयहिकाने जोरदार कामगिरी करत चमक दाखवली. तिसऱ्या गेममध्ये तिला चुरशीचा सामना करावा लागला. पण तिने विजय मिळविण्यात यश मिळवले.
अन्य एका चुरशीच्या सामन्यात युक्रेनच्या कोऊ ली याने अँथनी अमलराजला 2-1 (10-11, 11-10, 11-5) असे नमवित मेव्हरिक्ससाठी दुसरा विजय नोंदवला. विशेष म्हणजे स्पर्धेत पहिल्यांदा चार गेम गोल्डन पॉईंटने ठरविण्यात आले.
सविस्तर निकाल – आरपी- एसजी मेव्हरिक्स आघाडी वि. महाराष्ट्र युनायटेड 4-2, महिला एकेरी – अयहिका मुखर्जी वि. वि. लिली झांग 2-1 (10-11, 11-5, 11-10), पुरुष एकेरी – कोऊ ली वि. वि. अँथनी अमलराज 2-1 (10-11, 11-10, 11-5).




