breaking-newsमहाराष्ट्र

साहित्य संमेलनात हस्तक्षेप नाहीच, सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नका: मुख्यमंत्री

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात, त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते, असे मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यवतमाळमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांना निमंत्रण देण्यात आले होते. या संमेलनाच्या त्या उद्घाटक होत्या. न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध दर्शवला होता. या वादानंतर नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आले होते. यावरुनही मोठा वादंग निर्माण झाला.

नयनतारा सहगल यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत केले होते. त्यात साहित्य अकादमी पुरस्काराचाही समावेश होता; परंतु तो परत घेण्याची तरतूद नव्हती. सहगल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कुटुंबाशी नाते सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहगल यांनी सरकारविरोधात विधान केले तर मुख्यमंत्र्यांची पंचाईत होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन आयोजकांवर राजकीय दबाव आला असावा, अशी देखील चर्चा रंगली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे. यवतमाळ येथे आयोजित अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरुन वाद उभे केले जात आहेत. यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न सुध्दा काही माध्यमे हेतूपुरस्सर करत आहेत. अ.भा. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मा. मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, असे या पत्रकात म्हटले आहे. साहित्य संमेलनांमधून सरकारांवर/समाजातील निरनिराळया विषयांवर मते नेहमीच व्यक्त केली जात असतात. त्या मतांकडे/मंथनाकडे सरकारसुध्दा सकारात्मकपणेच पाहत असते. त्यामुळे अकारण ज्या विषयांचा संबंध नाही, तेथे राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्न करु नये, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button