breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘सनबर्न’मध्ये घातपाताचा होता कट

  • बेळगावातील चित्रपटगृहही होते लक्ष : एटीएसची माहिती

मुंबई – पुण्यात झालेल्या सनबर्न म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आणि बेळगावातील चित्रपटगृहात घातपात घडवण्याचा वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा कट होता, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र एटीएसच्या तपासातून समोर आली आहे. या कटाचा पूर्ण तपशील एटीएसने मुंबई सत्र न्यायालयासमोर ठेवला. दरम्यान, नालासोपारा स्फोटक साठा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊत, श्रीकांत पांगारकर, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या चारही आरोपींना न्यायालयाने 3 सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली.

राऊत, पांगारकर, कळसकर आणि गोंधळेकर या चौघांना 10 दिवसांची कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने आज चारही जणांना न्यायालयात हजर करण्यात आले असता एटीएसच्या वकिलांनी महत्त्वाची माहिती कोर्टात दिली. शरद कळसकरकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कॉम्प्युटरमधून माहिती डीकोड करण्यात आली आहे. त्यात महत्त्वाची माहिती हाती आली आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पाश्‍चिमात्य संगीत महोत्सवात तसेच बेळगावात पद्मावत सिनेमाच्या शोदरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा आरोपींचा कट होता. धर्मरक्षणासाठी त्यांना हे करायचे होते. त्यासाठी माजी नगरसवेक श्रीकांत पांगारकर हा आर्थिक मदत करणार होता, असे त्यातून उघड झाल्याचे एटीएसने कोर्टात सांगितले.

वैभव राऊतच्या घरातून जो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तो वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्यासाठी वापरण्यात येणार होता. हा सगळा शस्त्रपुरवठा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून झालेला आहे. राऊत आणि गोंधळेकर यांनी शस्त्रप्रशिक्षणही घेतलेलं असून जिथे हे प्रशिक्षण घेण्यात आलं तिथे जाऊन तपास करायचा आहे. यातील दोन केंद्रं महाराष्ट्रात आहेत तर बाकीची अन्य राज्यांत आहेत. तिथे जाऊन तपास करावा लागेल, असेही यावेळी न्यायालयात सांगण्यात आले.

कोडवर्डमध्ये संवाद
आरोपींचा संवाद कोडवर्डमध्ये व्हायचा. राऊत हा अटकेतील अन्य आरोपी व काही व्यक्तींच्या संपर्कात होता. या सर्वांमधील कोडवर्डमधील संवाद नेमका काय होता, याची चौकशी केली जाणार असून त्यातून आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागतील, असेही एटीएसने न्यायालयात नमूद केले. कळसकरकडून जप्त करण्यात आलेल्या नोटाही तपासात महत्त्वाच्या आहेत. त्याने घातपातासाठी काही ठिकाणांची रेकीही केली होती. शिवाय आरोपींकडून मोठ्या प्रमाणात डेटा व सीडी जप्त करण्यात आल्या असून त्याचीही चौकशी केली जाणार असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button