breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादीचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन

पिंपरी :-  महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी घेतलेल्या गणेशोत्सवातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्याप केले नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. सत्ताधारी भाजपच्या विरोधात महापालिका मुख्यालयाच्या इमारतीसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, तसेच नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज राष्ट्रवादीने आंदोलन केले.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक भागात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांकडून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध देखावे सादर केले जातात. अशा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्यावतीने बक्षीस देण्याची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. मात्र ही राष्ट्रवादीने सुरू केलेली चांगली परंपरा सत्ताधारी भाजपा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून या झोपी गेलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आज ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे.

दत्ता साने म्हणाले की, शहरामध्ये सामाजिक, सांस्कृतिक चळवळ वाढीस लागावी, सामाजिक एकोपा जपला जावा. पर्यावरण, स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी. या हेतूने सामाजिक व विधायक प्रबोधन व्हावे, या हेतूने पिंपरी महापालिकेतर्फे दरवर्षी गणेश मंडळांसाठी देखावा स्पर्धा घेतली जाते. समाज प्रबोधनामध्ये उत्कृष्ट मंडळांना बक्षीस दिले जाते. मात्र, गणेशोत्सव सुरू होऊन संपत आला तरी, अद्याप बक्षीसांचे वितरण केले गेले नाही. त्यामुळे मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मांगल्याचे प्रतिक समजल्या जाणार्‍या या गणरायाला देखील सत्ताधारी भाजपाने सोडले नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांचा प्रसिध्दीचा स्टंट

गतवर्षींच्या गणेश उत्सव कालावधीतील सार्वजनिक गणेश मंडळाच्या देखावा स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवारी (दि.21) रोजी करणार आहोत. त्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या. तरीही विरोधाला विरोध म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी प्रसिध्द स्टंट म्हणून आज (सोमवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले. केवळ लेखी द्या म्हणून आंदोलन करणे ही चुकीचे आहे. असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी म्हटले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button