breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी भाजपची ‘हुकूमशाही’, त्या संशयास्पद निविदा रद्द करा – नाना काटे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने मनमानी कारभार सुरू केला आहे. केवळ चार मिनिटात अठरा विषय आणि पाच उपसूचना वाचून न दाखविता जोरजबरदस्तीने मंजूर केल्या आहेत. सूचक अनुमोदक न देताच हे विषय नियमबाह्य पध्दतीने मंजूर केल्याने भाजपच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या संशयास्पद उपसूचना तातडीने रद्द कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

फेब्रवारी महिन्याची तहकूब सभा बुधवारी (दि.26) घेण्यात आली. सभेत सभाशास्राचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. या सभेमध्ये केवळ चार मिनिटांत अठरा विषय व पाच उपसूचना विषयांचे वाचन न करताच मंजूर केले. या उपसूचना न वाचता, त्या उपसूचनांना सूचक आणि अनुमोदक नसताना देखील त्या मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे साडेसातशे कोटींच्या उपसूचनांच्या वैधतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्या तांत्रिकदृष्टया बेकायदेशीर ठरतात, असा आरोप नाना काटे यांनी केला आहे.

कोट्यावधी रुपयांच्या उपसूचना घुसडण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुनियोजित सभागृहामध्ये गोंधळ घालून उपसूचना न वाचताच घुसडण्यात आल्या. उपसुचनांच्या प्रतींची मागणी केली. परंतु, अद्याप प्रशासनाकडेही या उपसूचना आल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये नक्कीच गोलमोल आहे. त्यामुळे या उपसूचना रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

सभाशास्त्राचे नियम पायदळी

महापालिका सभाशास्त्र नियमाप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवरील विषयाचे सविस्तर वाचन होणे अत्यावश्यक असते. त्यावर साधक बाधक चर्चा घडवून त्या विषयाला अनुमोदन देऊन निर्णय होणे अपेक्षित असते. उपसुचनादेखील त्या विषयांशी सुसंगत मांडून पूर्ण वाचन करुन त्या उपसुचनेवर साधक बाधक चर्चा होऊन उपसुचना स्वीकारणे अथवा नाकारण्याबाबत निर्णय घेणे अपेक्षित असते. बुधवारच्या सर्वसाधारण सभेत जो प्रकार झाला. यावरुन सत्ताधारी भाजपला महासभा संचलन करता येत नसल्याचे सिद्ध झाले. या सर्व कामकाजावरून भाजपचा कार्यभार संशयास्पद वाटत आहे, असा आरोपही नाना काटे यांनी केला आहे.

करवाढीविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करणार

महापालिका अधिनियमानुसार 20 फेब्रुवारी पूर्वी करविषयक प्रस्तांवाना सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळणे आवश्यक असते. मात्र, असे असताना 20 फेब्रुवारीची सर्वसाधारण सभा सत्ताधारी भाजपने मुद्दाम तहकूब केली आणि प्रशासनास करवाढ करण्यास मूक संमती दिली. करवाढ हे भाजपचेच पाप आहे. ही करवाढ रद्द करावी म्हणून आम्ही विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक एकत्र येऊन रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचा इशाराही काटे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button