breaking-newsक्रिडा

संजीवनीवर दोन वर्षांची बंदी

नवी दिल्ली : भारताची लांबपल्ल्याची धावपटू संजीवनी जाधव हिच्यावर उत्तेजक द्रव्य सेवन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे.

नाशिक येथील २३ वर्षीय संजीवनीने २०१९ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक, तर २०१७च्या याच स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली होती. संजीवनीने पहिल्यांदाच उत्तेजकविरोधी नियमांचा भंग केल्यामुळे आयएएएफच्या अ‍ॅथलेटिक्स एकात्मता विभागाने तिच्यावर दोन वर्षांची बंदी लादली आहे. त्याचबरोबर २९ जून २०१८पासून तिच्या बंदीचा कालावधी सुरू होणार असून त्यानंतर तिने केलेली कामगिरी, पदके, बक्षिसाची रक्कम रद्द ठरवण्यात येणार आहे.

‘‘उत्तेजकविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संजीवनीने आपली चूक मान्य केली आहे. शिस्तपालन लवादासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान आपल्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी तिने केली होती. उत्तेजकविरोधी नियमानुसार संजीवनीची ही पहिली चूक असल्यामुळे तिला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली,’’ असे एकात्मता विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

भारताच्या राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेला (नाडा) या निर्णयाविरोधात लुसाने येथील क्रीडा लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात संजीवनी जाधव उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१८मध्ये घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत तिच्या रक्ताच्या नमुन्यात तिने प्रोबेनेसिड हे प्रतिबंधित औषध घेतल्याचे समोर आले होते. तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईदरम्यानही तिला यावर्षी झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. या स्पर्धेत १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर नाडाची परवानगी मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात झालेल्या दोहा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत संजीवनीने ३२.४४.९६ सेकंद अशी वेळ देत कांस्यपदक पटकावले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button