breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शितोळेंना गॅस शवदाहिनीची मलई पडली महागात; भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांचा आरोप

  • सांगवीत राष्ट्रवादी-भाजप भिडले
  • एकमेकांवर सडकून टिका

पिंपरी (महा ई न्यूज) – शहरातील स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधी रुपये लाटण्याचा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांचा डाव महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपने उधळून लावला होता. त्याआधीच सांगवीतील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्याच्या कामात कोट्यवधींची मलई कोणी खाल्ली, हे शहरातील जनतेला वेगळे सांगण्याची गरज नाही. शितोळे यांना ही मलई इतकी महागात पडली की महापालिका निवडणुकीत सांगवीतील मतदारांनी कायमचे घरी बसविले. मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी सांगवीतील स्मशानभूमीच्या रखडलेल्या कामांवरून भाजपला टार्गेट करणे म्हणजे “मी नाही त्यातली कडी लावा आतली”, अशी भूमिका घेण्याचा प्रकार असल्याची टिका भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांच्यावर केला आहे.

 

सांगवीतील रखडलेल्या स्मशानभूमीच्या कामांवरून प्रशांत शितोळे यांनी भाजपवर केलेल्या टिकेला भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हर्षल ढोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “सांगवीत मुळा नदीच्या काठावर स्मशानभूमीचे काम सुरू आहे. या कामाला मागील पंचवार्षिकमध्येच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना मंजुरी देण्यात आली. प्रशांत शितोळे यांनी पोसलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामाला मंजुरी देण्यासाठी त्यावेळी गरसेवक असलेल्या शितोळे यांनी मलाई खाल्ली आहे, हे उघड गुपित आहे. स्मशानभूमीच्या जागेचा वाद उकरून काढत शितोळे यांनी मोबदला मिळावा म्हणून कामाला आडकाठी आणली आहे, असा आरोप ढोरे यांनी केला आहे.

 

स्मशानभूमीच्या जागेचाही मोबदला मागण्याची खालची पातळी शितोळे यांनी गाठली. या जागेच्या सात बारा उताऱ्यावर अनेक नागरिकांची नावे आहेत. त्यात शितोळे हे देखील नाव आहे. त्यामुळे आपणाला मोबदला मिळावा म्हणून शितोळे यांनीच स्मशानभूमीचे काम बंद पाडले. कामाचा ठेकेदार शितोळे यांनीच पोसलेला असल्यामुळे त्यानेही प्रशासनाकडे काम पूर्ण व्हावे यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यासाठी पाठपुरावा केला नाही. या कामाची मुदत संपून गेली आहे. त्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे. स्मशानभूमीची जागा नदीपात्रातील असल्यामुळे त्याचा मोबदला देता येत नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे, असेही ढोरे यांनी नमूद केले आहे.

 

शितोळे यांनी झोपडपट्टीवासियांना दम भरला – ढोरे

प्रशांत शितोळे यांनी स्मशानभूमीच्या कामाची अडवणूक करून काम बंद पाडले आहे. आता हेच शितोळे भाजप नगरसेवकांच्या नावाने सांगवी भागातील नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. वास्तविक नगरसेवक पद न राहिल्यामुळे शितोळे यांची दुकानदारी कायमची बंद झाली आहे. ठेकेदारांना धमकावणे, ठेकेदारांच्या नावाने कामे घेऊन स्वतःच करणे, असे उद्योग करून नगरसेवक असताना शितोळे यांनी अमाप माया गोळा केली. शितोळे यांनी मुळानगर झोपडपट्टीवासीयांना प्रत्येक कुटुंबामागे दोन-दोन हजार रुपये महिना भाडे देण्याचा दम भरला आहे, असा आरोप ढोरे यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button