breaking-news

शहीद धनाजी होनमाने यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले पोलीस उपनिरिक्षक धनाजी होनमाने यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद धनाजी यांचे पार्थिव पुळूज येथे आल्यावर त्यांच्या आई-वडिलांसह गावकऱ्यांना शोक अनावर झाला होता. पालकमंत्री, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदींनी यावेळी त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर होनमाने यांचे बंधू विकास यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे नक्षलवाद्यांच्या चकमकीत शीघ्र कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने रविवारी शहीद झाले. शहीद धनाजी हे पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनाची वार्त कळताच पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुळूज येथे आणण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, आमदार भारत भालके यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यानंतर शहीद होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यावेळी त्यांच्या आई-वडिलांच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी उपस्थितांना देखील भावना अनावर झाल्या होत्या. यावेळी ग्रामस्थांनीही त्यांचे अत्यंदर्शन घेतले. दरम्यान, पुळूज येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे, उमेश परिचारक आदींनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

विशेष म्हणजे करोनामुक्तीचा लढा सध्या सुरू आहे. अशातच आपल्या गावच्या लाडक्या वीर सुपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थितांनी परस्परांत योग्य अंतर आणि तोंडाला मास्क लावले होते. यावेळी शहीद होनमाने यांना पोलीस दलांच्यावतीने आणि बॅण्डने विशेष मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलीस दलांच्यावतीने शोकसंदेश वाचून दाखवला. त्यानंतर शहीद होनमाने यांचे बंधू विकास होनमाने यांनी मुखाग्नी दिला. यानंतर उपस्थितांनी दिलेल्या ‘भारत माता की जय…’ शहिद धनाजी होनमाने अमर रहे… अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button