breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराला वैभवशाली बनवण्यासाठी एकजुटीने साथ द्या – महापौर माई ढोरे

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी चिंचवड औदयोगिक नगरीला स्मार्ट सिटी करण्यासाठी शहरवासियांचे योगदान महत्वपूर्ण असून या शहराला देशातील सर्वोत्तम वैभवशाली शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी अशीच एकजुटीने साथ दयावी, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर ढोरे यांनी शहरवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका स्थापनेचा वर्धापनदिन आज साधेपणाने साजरा करण्यात आला. शहराच्या जडणघडणीचे शिल्पकार असलेले दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या महापालिका मुख्य प्रशासकीय भवनातील पुतळयास महापौर ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग समिती सभापती शर्मिला बाबर, ब प्रभाग समिती सभापती सुरेश भोईर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, पदाधिकारी योगेश रसाळ, गोरख भालेकर, बाळासाहेब कापसे, योगेश वंजारी, अमित जाधव, शुभांगी चव्हाण, सुप्रिया सुरगुडे, धनाजी नखाते, रणजित भोसले, अविनाश तिकोणे, मंगेश कोंढाळकर, तुकाराम गायकवाड, कविता सातपुते, सामाजिक कार्यकर्ते गुलाब पानपाटील, संभाजी बारणे, उमेश गवळी, तुषार काळभोर, निलेश घुले आदीसह कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराला उदयोगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा या शहराचा पाठकणा असल्याचे नमूद करुन महापौर ढोरे म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणा-या प्रत्येकाच्या त्यागाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवून शहराला वैभव प्राप्त करुन दिले. इथल्या उदयोगधंदयांनी शहराच्या विकासात भर घातली. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, व्यापारी, उदयोजक, खेळाडू, डॉक्टर, अभियंता, संशोधक, कलावंत, साहित्यिक, माध्यम प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची नगरी घडली आहे. या शहराला वैभवशाली बनविणा-या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन महापौर ढोरे यांनी सर्वांचे आभार मानले.

महापौर ढोरे म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन अल्पावधीत विकासाचे विविध टप्पे पार करणा-या या शहराने विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. उत्तम पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थ‍िक दुर्बलांसाठी तसेच शहर झोपडपट्टी विरहित व्हावे यासाठी परवडण्यायोग्य घरे, मेट्रो प्रकल्प, प्रशासकीय कामात ऑनलाईन पध्दतीचा वापर, दळण – वळणासाठी रस्ते, पूल, क्रीडांगणे, उदयाने, विविध योजना महापालिकेच्या माध्यमातून निरंतर राबविल्या जात आहेत. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवित असून नागरिक देखील आपल्या परीने योगदान देत आहेत. कोरोना साथीचे संकट दूर करण्यासाठी आपले सांघिक प्रयत्न महत्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी महापौर ढोरे यांनी सांगितले.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे म्हणाले, शहराच्या जडण – घडणीमध्ये प्रत्येकाचा वाटा असून कुटुंबाप्रमाणे राहून कामकाजाचा गाडा आपण पुढे नेत आहोत. नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना महामारीतून आपण लवकरच बाहेर पडू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button