breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधी पक्षनेते पदासाठी अल्पसंख्यांक चेह-याला संधी, जावेद शेख रेसमधील ‘डार्क हॉर्स’

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला पदाचा राजीनामा
  • नाना काटे, मयूर कलाटे, वैशाली घोडेकर, शेख यांच्यात रस्सीखेच

– अमोल शित्रे

पिंपरी, (महाईन्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आदेश येताच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्षाकडे पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी आता कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, माजी महापौर वैशाली घोडेकर तिव्र इच्छुक आहेत. तरी नगरसेवक जावेद शेख हे पदाच्या रेसमधील ‘डार्क हॉर्स’ ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कसर भरून काढण्यासाठी विरोधी पक्षनेते पदावर अल्पसंख्यांक चेह-याला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे शहरातील पक्षाच्या नेत्यांनी अल्पसंख्यांक चेह-याला समर्थन द्यावे, असा सूचक इशारा देखील पक्षनेतृत्वाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची मोठी ताकद असताना लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्यांक मतदारांचा कौल प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मिळाला. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याने पक्षनेतृत्वाकडून आता सावज राखून पाऊल उचलले जात आहे. पावलो पावली विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी पक्षनेतृत्वाने चाणाक्ष भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या विखुरलेल्या अल्पसंख्यांक मतदारांना एकत्र करण्यासाठी अल्पसंख्यांक चेह-याला विरोधी पक्षनेते पदी संधी देण्याची खलबते पक्षामध्ये सुरू आहेत. अल्पसंख्यांकांची मते खेचून आणण्यासाठी पक्षाकडे प्रभावी चेहरा नसल्यामुळे चाचपणी सुरू आहे. महापालिकेच्या सभागृहात पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडणारा नेता म्हणून दत्ता साने यांच्यानंतर आता नगरसेवक जावेद शेख यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदी शेख यांना विराजमान करण्याचा निर्णय घेण्यासाठी पक्षनेतृत्व सकारात्मक असल्याची माहिती समजते.

विरोधी पक्षनेते पदी नाना काटे, मयूर कलाटे आणि माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी दावा ठोकला आहे. नगरसेवक नाना काटे चिंचवड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी देखील तिव्र इच्छुक आहेत. विधानसभा लढविण्याची इच्छा प्रकट केलेल्या व्यक्ताला विरोधी पक्षनेते पद देण्याबाबत पक्षांतर्गत काही पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांची पक्षनेतृत्वाकडे नकारघंटा आहे. तर, मयूर कलाटे यांनी देखील चिंचवड विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच कलाटे यांना महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समिती सदस्य पदावर संधी देऊन अल्पसा कालावधी उलटला आहे. त्यामुळे पुन्हा कलाटे यांना विरोधी पक्षनेता हे पद देण्याबाबत काहींचा नकार असल्याचे चित्र आहे. तर, माजी महापौर वैशाली घोडेकर या देखील पदाच्या रेसमध्ये आहे. घोडेकर परखड आणि प्रभावी बोलणा-या पदाधिकारी आहेत. त्यांचाही या पदासाठी विचार केला जात असल्याची माहिती आहे. परंतु, अल्पसंख्यांक चेहरा म्हणून जावेद शेख यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्यांना पदावर बसवून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील अल्पसंख्यांकांची मते पक्षाकडे आकर्षित करून घेण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न असल्याचे दिसते.

साने यांनी संधीचे ‘सोने’ केले…

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गलथान कारभाराचा खरपूस समाचार घेण्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते योगेश बहल कमी पडले. ती कसर दत्ता साने यांनी संधी मिळताच भरून काढली आहे. सर्वसाधारण सभेतील विषयांची परखड मांडणी, विषयांच्या खोलात जाण्याची तयारी, नागरिकांच्या प्रश्नांचा निक्षुन पाठपुरावा करण्याची त्यांची चिवट भूमिका कौतुकास्पद आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावर सत्ताधा-यांपेक्षा कांकाचीच मजबूत पकड निर्माण झालेली आहे. आयुक्त श्रावण हार्डीकर यांना सुध्दा तालावर आणून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर काकांचा भर होता. पक्षाकडून मिळालेल्या एक वर्षाच्या संधीचे काकांनी सोने केल्याचे समाधान काकांच्या समर्थकांमध्ये व्यक्त होत आहे. पालिकेतील सत्तांतरानंतर पहिल्याच वर्षात मरगळ आलेल्या राष्ट्रवादीला नवचेतना मिळवून देण्याचे काम काकांनी केले आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना व्यक्तीगत आणि पक्षाला नक्कीच फायदा होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button