breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाहतूक कोंडीचा ‘आयटी’ला आर्थिक फटका

  • हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे वार्षिक १५०० कोटींचे नुकसान; पायाभूत सुविधांचाही अभाव

राज्यातील सर्वात मोठे ‘आयटी पार्क’ अशी ओळख असलेल्या हिंजवडी ‘आयटी पार्क’कडे जाणाऱ्या रस्त्यावर होत असलेली प्रचंड वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तेथील लहान-मोठय़ा कंपन्यांचे मिळून वार्षिक तब्बल पंधराशे कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. विशेष म्हणजे वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी ‘आयटी पार्क’मध्ये पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांना वार्षिक बारा लाख किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.

विविध अडचणींमुळे कंपन्यांचे होत असलेले स्थलांतर, कार्यप्रणाली आणि विविध सेवा-सुविधांवर येत असलेला ताण आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर झालेला प्रतिकूल परिणाम यामुळे कंपन्यांची उत्पादन क्षमता घटत असून कंपन्यांना वार्षिक तोटाही सहन करावा लागत आहे.

हिंजवडी ‘आयटी पार्क’मधील वाहतूक कोंडीने उग्र रूप धारण केले आहे. त्यातच पायाभूत सुविधांचा अभाव कंपन्यासाठी चिंतेचा विषय आणि कळीचा मुद्दा ठरला आहे. दररोज तीन लाख कर्मचारी हिंजवडी परिसरातून ये-जा करतात. दोन ते तीन तासांच्या वाहतूक कोंडीमुळे इंधनावर होणारा अतिरिक्त खर्च, कंपनीत येण्यास उशीर होत असल्यामुळे कंपन्यांची घटलेली उत्पादन क्षमता, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होत असलेला प्रतिकूल परिणाम आणि त्यातून कंपन्यांचे होत असलेले स्थलांतर या सर्व व्यवस्थेचा भार कंपन्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना वार्षिक १२ लाख किलोमीटरचा जादा प्रवास करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचे परिणाम दिसून येण्यास सुरुवात झाली आहे.

प्रवासासाठी अधिक वेळ

हिंजवडी परिसरातील माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये दररोज किमान तीन ते चार लाख कर्मचाऱ्यांचा राबता असतो. तीन ते सहा किलोमीटर अंतरासाठी आयटिअन्सना किमान दोन ते तीन तासांचा प्रवास करावा लागत आहे. अनेक वर्षे ही परिस्थिती कायम आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मिळून किमान १ लाख २५ हजार वाहने रस्त्यावर असतात. प्रतीदिन प्रत्येक गाडीमागे किमान एक लिटर पेट्रोल किंवा डिझेल गृहीत धरले तर प्रतिदिन २५ ते ३० कोटी रुपयांच्या इंधनाचा वाहतूक कोंडीमुळे अतिरिक्त खर्च होत आहे. हा भार काही प्रमाणात कंपन्यांनाही सोसावा लागत आहे. इंधनावर ३० ते ६५ टक्के अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

स्वाक्षरी मोहीम, कृती आराखडा

विविध अडचणींमुळे आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘आयटिअन्स’ एकवटले आहेत. ttps://goo.gl/WwXGTp या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमही सुरु करण्यात आली आहे. त्याला आयटिअन्सचा वाढता प्रतिसाद मिळत असून आयटिअन्सना भेडसावित असलेला प्रश्न मांडतानाच कोंडी होणारे रस्ते, डार्क स्पॉटची निश्चिती आणि त्यावरील आराखडाही या लिंकच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.

कंपन्यांचे नुकसान

प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान आठ तास कंपनीसाठी देणे अपेक्षित असते. साधारणपणे नऊ ते साडेनऊ तास त्याचे वास्तव्य कंपनीत असते. एका कर्मचाऱ्यामागे २५ डॉलर (१७५० रुपये) प्रती तास याप्रमाणे कंपनीला उत्पन्न मिळत असते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते तीन तास प्रवासात जात असल्याने कर्मचाऱ्यांना तो वेळ भरून काढण्यासाठी तेवढा वेळ कंपनीत थांबवून घेतले जाते. त्यामुळे कंपन्यांचे प्रती कर्मचाऱ्यामागे सर्वसाधारण दीड तासांचे नुकसान होत आहे. हिंजवडीमध्ये असलेली तीन लाख कर्मचारी संख्या विचारात घेता एका कर्मचाऱ्यामागे ५० हजार रुपयांचे उत्पन्नाचे नुकसान कंपनीला सहन करावे लागत आहे. त्यामुळे कंपनीचे वार्षिक १४० ते १५० कोटींचे नुकसान होत आहे.

वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे लहान मोठय़ा कंपन्यांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. तीन पद्धतीने कंपन्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. रोजगाराच्या संधीही हातातून जात असून राज्य शासनाच्या महसुलावरही त्याचा परिणाम होत आहे. विविध प्रकारच्या व्यवस्थेचा आर्थिक भार कंपन्यांना सोसावा लागत आहे.

– अ‍ॅड. हेमंत चव्हाण, माहिती आणि सुरक्षा अधिकारी, हिंजवडी पार्क

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button