breaking-newsमहाराष्ट्र

वाघिणीला पकडण्यासाठी आणलेल्या हत्तीचा धुमाकूळ

  • बिथरून केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

नागपूर – तेरा जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून आणलेला हत्ती बिथरल्याने लोकवस्तीत शिरला आणि त्याच्या हल्ल्यात एक महिला मृत्युमुखी तर एक वृद्ध जखमी झाला. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे पांढरकवडा विभागातील राळेगाव जंगलात सुरू असलेल्या मोहिमेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव अर्चना कुळसंगे (३५) रा. चहांद असे आहे, तर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव नामदेव सवाई असे असून ते पोहणा  येथील रहिवासी आहेत.

टी-१ वाघिणीला पकडण्यासाठी मध्यप्रदेशवरून चार तर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘गजराज’ या हत्तीला आणले होते. हत्ती एका दिवसात चार तासांपेक्षा अधिक वेळ काम करू शकत नाही. त्यामुळे माहुताने गजराजला विश्रांतीसाठी एका ठिकाणी बांधले. मात्र, साखळी नीट बांधली नसल्याने त्याने  तेथून पळ  काढला.  तब्बल दोन तासानंतर ही बाब माहुताच्या लक्षात आली. त्याने शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत गजराजने गावात धुमाकूळ घातला होता.  जंगलक्षेत्राबाहेरील  चहांद  गावातील अर्चना मोरेश्वर कुळसंगे या घरापुढील शेण काढणाऱ्या महिलेवर गजराजने हल्ला केला. लगतच्या पोहणा येथील  नामदेव  मुंकुदा सवाई (७२) यांनाही जखमी केले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्वयंसेवींच्या आंदोलनानंतर आणि मेनका गांधींनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या मोहिमेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली. मात्र, त्याचवेळी या मोहिमेदरम्यान एक जरी मानवी बळी गेला तरी खपवून घेतले जाणार नाही, असा गंभीर इशारा दिला होता. त्यामुळे वनमंत्री आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही हल्ला

एका महिलेला ठार मारणाऱ्या गजराजला परत ताडोबाला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी याच मोहिमेसाठी त्याला  गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान पांढरकवडा येथे आणले होते. त्याही वेळी त्याने  दोन जणांना जखमी केले होते.

वाघिणीच्या पाऊलखुणा आढळून आल्या असून कॅमेरा ट्रॅपमध्ये छायाचित्रे आली आहेत. तिला पकडण्याची मोहीम अंतिम टप्प्यात असताना ही घटना घडली. त्यामुळे मोहिमेला धक्का बसला आहे.

–  सुनील लिमये, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button