राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिलेचा विनयभंग, सहायक पोलीस फौजदार निलंबित
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कौटुंबिक तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत गेलेल्या महिलेचा विनयभंग करणा-या सहायक पोलीस फौजदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
रामनाथ पालवे असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक पोलीस फौजदाराचे नाव आहे. त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवे हा चिखली पोलीस ठाण्यांतर्गत येणा-या पोलीस चौकीत कार्यरत आहे. तक्रारदार महिला ही राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. महिलेचे पतीसोबत कौटुंबिक वाद झाल्याने पोलिसांत पतीविरोधात तक्रार देण्यासाठी ती बुधवारी (दि. 11) रात्री चौकीत गेली होती. त्यावर कर्तव्यावर असलेल्या पलवे याने महिलेची प्राथमिक तक्रार नोंदवून घेतली. त्यात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर पालवे याने मध्यरात्री फोन केला. संभाषणात अश्लिल भाषेचा वापर करून महिलेचा विनयभंग केला. संबंधित महिलेने तातडीने वरीष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यावर वरिष्ठांनी पालवे याच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावर आयुक्त पद्मनाभन यांनी तातडीने पालवे याला निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालवे याला निलंबित करण्यात आले आहे.