यंदा ‘प्रजासत्ताक दिनी’ महाराष्ट्राच्या चित्ररथाची ही थीम!
मुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रत्येक राज्यातील चित्ररथांचे संचलन होते. यातून प्रत्येक राज्यातील कला, संस्कृतीचे दर्शन घडवले जाते. या वर्षी २६ जानेवारीला राजपथावर संचलन करण्यासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून यंदाचा चित्ररथ ‘छोडो भारत’ या संकल्पनेवर आधारित असेल.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. १९४२मधील ‘छोडो भारत’ चळवळ ही यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम आहे. या वर्षी महात्मा गांधी यांची १५०वी जयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने यावर्षी सर्वच राज्यांना चित्ररथासाठी ‘गांधी’ ही संकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे विविध राज्य महात्मा गांधी यांना आदरांजली वाहत या संकल्पनेवर आधारित चित्ररथ बनवणार आहेत. प्रत्येक राज्य कोणकोणते विषय चित्ररथावर साकारतात, हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.