breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मेट्रो प्रकल्प ‘स्लो ट्रॅक’वर

  • कर्वे रस्ता, नदीपात्रातील कामाचा वेग मंदावला

पुणे- कर्वे रस्ता आणि नदीपात्रात सुरू असलेल्या मेट्रो मार्ग खांबांचे काम मंदावल्याचे चित्र आहे. कर्वे रस्त्यावर काम सुरू करून तब्बल महिनाभराचा कालावधी लोटला असला, तरी अजून या भागात खड्डे घेण्याचे कामच सुरू असल्याची माहिती महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. तर जूनमध्ये या रस्त्यावरील दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी पावसामुळे हे काम मागे पडण्याची शक्‍यता आहे.

महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी या मार्गातील वनाज ते धान्य गोदाम या कामाची सुरूवात पौड रस्त्यावरील वनाजपासून तर नदीपात्रात सावरकर स्मारकाच्या मागील बाजूला करण्यात आली होती. नदीपात्रातून सुमारे 1.10 किलोमीटरचा मार्ग जाणार असून त्यात सुमारे 59 खांब आहेत. त्यातील जेममेत 16 ते 17 खांबाच्याच फुटिंगचे काम महामेट्रोला करता आले असून जूनपर्यंत आणखी 5 ते 10 खांबाच्या फुटिंगचे नियोजन आहे.

मात्र, पावसाळ्यात या भागात काम करण्याच्या अडचणी असल्याने हे काम बंद करावे लागणार आहे. असे असतानाच, मागील महिन्यात महामेट्रोने कर्वे रस्त्यावर सावरकर स्मारक ते गरवारे महाविद्यालयापर्यंत काम सुरू केले. सुमारे महिनाभर हे काम सुरू असले, तरी अजून खड्डे घेण्याचेच काम सुरू आहे. त्यातच पावसाळ्यात या रस्त्यावर स्वातंत्र्य चौकातून गरवारे महाविद्यालयाकडे मोठा उतार असल्याने पाणी येते. त्यामुळे हे कामही बंद पडण्याची शक्‍यता आहे. असे असताना मेट्रोकडून हे काम वेगाने होणे अपेक्षित होते. मात्र, त्या कामासही गती मिळत नसल्याने ऐन पावसाळ्यात हे काम रखडले जाण्याची भिती आहे.

वाहतूक कोंडीची भर
एका बाजूला महामेट्रोचे काम संथ गतीने सुरू असतानाच;दुसऱ्या बाजूला या कामासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेट्‌समुळे वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सावरकर स्मारकाकडून कर्वे रस्त्याला जाताना, गरवारे महाविद्यालय तसेच सह्याद्री हॉस्पीटलच्या समोर दोन बस थांबे आहेत. त्यामुळे या थांब्यावर पीएमपी बसेस आखून दिलेल्या रेषांवर न थांबता रस्त्याच्या मधोमधच थांबत आहेत.

या शिवाय, गरवारे महाविद्यालय चौकात लगेच सिग्नल असून त्याचा वेळ वाढविण्यात आलेला नाही. त्यामुळे एकामागोमाग दोन अथवा तीन पीएमपी बस येताच या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे एका सिग्नलला जेमतेम 10 ते 12 बसेस जातात. त्यातच हे काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावर दुर्तफा वाहने पार्किंग करण्यास व जड वाहनांना बंदी घातली जाणार होती. मात्र, या रस्त्यावर सर्वत्र चारचाकी वाहने व रिक्षा राजरोसपणे थांबत असून एसटीच्या शिवशाही तसेच इतर गाड्यांची अजूनही वाहतूक सुरूच असल्याचे चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button