breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मेट्रोच्या ‘मोबिलिटी कार्ड’मध्ये खासगी वाहतुकीचाही अंतर्भाव

एकाच तिकिटावर बहुपर्यायी वाहतूक सेवेचा लाभ मिळणार

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी प्रवाशांना सोपी, सोयीस्कर आणि उपयुक्त ठरेल या दृष्टीने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे मेट्रो, पीएमपी, उपनगरीय रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीबरोबरच खासगी वाहतूक सेवेचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रोकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यामुळेच एका तिकिटावर बहुपर्यायी वाहतूक सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल.

शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दृष्टीने होत असताना विविध पायाभूत सुविधांची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वाहतुकीच्या सुविधांचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने महामेट्रोकडून नियोजन सुरू झाले आहे. त्या अंतर्गत मोबिलिटी कार्डद्वारे ओला-उबेर या खासगी वाहतुकीसह महापालिका आणि स्मार्ट सिटीतील भाडेतत्त्वावरील सायकल योजनांचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे.

नागपूर मेट्रोच्या धर्तीवर पुण्यातही या प्रकारचे मोबिलिटी कार्डची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून म्हणजे एकदाच तिकीट काढून पीएमपी, मेट्रो, उपनगरी रेल्वेचा प्रवास करणे शक्य होणार आहे. मोबिलिटी कार्ड अत्याधुनिक तंत्रत्रानावर आधारित असेल. मोबाइल फोनद्वारे या मोबिलिटी कार्डचा वापर प्रवाशांना करता येईल. त्यासाठी स्टेशन कोड देण्यात येणार असून मार्गावरील प्रवासाचा सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीचा तिकीट दरही त्यात देण्याचे नियोजित आहे.  शहरात मेट्रो मार्ग सुरू करण्यात आल्यानंतर लगचेच मोबिलिटी कार्डची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लोणावळा आणि दौंड पर्यंतचा उपनगरीय रेल्वे प्रवास या कार्डच्या माध्यमातून करण्यात येईल. खासगी वाहतुकीचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीनेही संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येणार आहे.

शहरी वाहतुकीत होणाऱ्या बदलांच्या पाश्र्वभूमीवर प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी मेट्रोकडून पर्यावरणपूरक ई-बस सेवा (फिडर सव्‍‌र्हिस) सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मेट्रोकडून काही प्रमुख मार्गावर ही पूरक ई-बस सेवा सुरू करण्यात येणार असून काही ठिकाणी पीएमपीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. रेल्वे स्थानके, विमानतळ, बसस्थानक, व्यावसायिक क्षेत्रे ई-बसच्या माध्यमातून मेट्रो स्थानकांशी जोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी महामेट्रोकडून स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील नवीन व जुन्या भागाला बससेवा, ई रिक्षा, मोबाइलच्या माध्यमातून जोडण्याची योजनाही विचाराधीन आहे. प्रवाशांसाठी ही सेवा कमी खर्चिक, वेळेची बचत करणारी ठरणार आहे.

पीएमपीचे मोबिलिटी कार्ड अयशस्वी

स्मार्ट सिटीअंतर्गत पीएमपीकडूनही मोबिलिटी कार्डची सेवा सुरू करण्यात आली होती. पीएमपीच्या अनेक मार्गावर एकाच तिकिटावर प्रवास करता यावा, हा यामागील हेतू होता. मात्र पीएमपीची ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. पीएमपीचे मोबिलिटी कार्ड २५ हजार प्रवाशांनी घेतले आहे. मात्र त्यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यातच पीएमपीच्या मोबिलिटी कार्डमध्ये अत्याधुनिक यंत्रणांचा अभाव आहे. त्यामुळे ही योजना पूर्णपणे अपयशी ठरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button