breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मावळच्या तरुणांकडून ‘डिस्पोजेबल मास्क’ची निर्मिती; ‘ससून’ व ‘नायडू’ला ५० हजार मास्क देणार!

– विशाल सांगडे, धीरज डेरे, नितीश सांगडे यांचे संशोधन 

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकजण आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. मावळ तालुक्यातील काही तरुणांनी एकत्रित संशोधन करून मास्क बनविण्याच्या मशीनची व डिस्पोजेबल मास्कची निर्मिती केली आहे. त्यांच्या या अविष्काराने स्वस्तात चांगल्या दर्जाचे मास्क उपलब्ध झाले आहेत. मावळातील बेबेडोहोळ येथील सोलेस हुजियानिओ प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातुन विशाल सांगडे, धीरज डेरे, दिनकर भिलारे, आशिष पायगुडे, नितीश  सांगडे आणि पियुष मेंडेकर यांनी स्वतः संशोधन करून हे मास्क बनवले आहेत. सगळेजण मेकॅनिकल इंजिनजर असून, मित्रही आहेत. विशाल सांगडे ह्यांनी अमेरीकीतून एमएस ही पदवी पूर्ण केली आहे, तसेच ते पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.

याविषयी बोलताना विशाल सांगडे म्हणाले, “कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा मास्कचा तुटवडा निर्माण झाला होता. आम्ही सॅनिटरी नॅपकिन बनविण्याच्या उद्योगात आहोत व ‘विनहर’ नावाच्या ब्रँडने आम्ही माफक दरात बाजारात नॅपकिन पुरवत आहोत. त्यामुळे आपण मास्क निर्माण करू शकू, असा विचार आला. लॉकडाऊन असल्याने उत्पादन करणे आव्हानात्मक होते. शिवाय त्यासाठी लागणारी मशिनरी नव्हती. तेव्हा आमच्या इंजिनिअरिंगचा उपयोग करून घेत आम्ही स्वतः मशीन तयार केली. त्यावर उत्पादन सुरू केले. या कामात कर्मचारी आणि इतर साहित्याची गरज होती. त्याबाबतीत अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, तहसीलदार मधुसूदन बर्गे, रोटरी तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष मनोज ढमाले आणि श्रीदया फाउंडेशनचे राज देशमुख यांचे सहकार्य मोलाचे ठरले.”

“ससून सर्वोपचार रुग्णालय आणि नायडू रुग्णालय यांना प्रत्येकी २५००० मास्क मोफत देण्याचा सोलेस कंपनीचा मानस आहे. मास्क तीन लेअरचे असून, ९५ टक्के सुरक्षा देणारे आहेत. बॅक्टेरिया फिल्टर उच्च दर्जाचा आहे. या मशीनची उत्पादन क्षमता दिवसाला एक लाख मास्क बनविण्याची आहे. आपल्या देशासाठी काम करण्याची हीच वेळ आहे व विविध संस्थांच्या माध्यमातून गरजूंना हे मास्क माफक दरात दिले जाणार आहेत. लवकरच याचे पेटंटही फाईल केले जाणार आहे,” असे विशाल सांगडे यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button