breaking-newsक्रिडा

भारतीय संघाप्रमाणेच ‘बीसीसीआय’चे नेतृत्व करेन!

  • नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीचा निर्धार

मुंबई : भारतीय संघाप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नेतृत्व करेन. ‘भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समान बीसीसीआय’ यासाठी मी वचनबद्ध राहीन, अशी तत्त्वप्रणाली अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीने बुधवारी मांडली.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असा लौकिक असलेल्या ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ४७ वर्षीय गांगुलीने बुधवारी स्वीकारली. २००० ते २००५ या कालखंडात देशाचे यशस्वी नेतृत्व सांभाळणाऱ्या गांगुलीने नव्या डावाला प्रारंभ करताना भारती क्रिकेट कर्णधाराचा गडद निळा कोट परिधान करून सर्वाचे लक्ष वेधले.

‘‘मला जे योग्य वाटेल आणि ‘बीसीसीआय’च्या भल्याचे वाटेल ते करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. ‘बीसीसीआय’च्या विश्वासार्हतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समानता हे धोरण मी राबवणार आहे. याच मार्गाने मला संघटनेला पुढे न्यायचे आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या गांगुलीने सांगितले.

‘‘मी जेव्हा भारताचा कर्णधार झालो, तेव्हा हा कोट मला मिळाला होता. परंतु हा सैल होता, हे तेव्हा मला लक्षात आले नव्हते. परंतु आज महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना तो परिधान करण्याचा मी निर्णय घेतला,’’ असे गांगुलीने सांगितले.

‘बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी संघटनेच्या मुख्यालयात झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीची ३३ महिन्यांचे वादग्रस्त प्रशासन संपुष्टात आले. २०१७ मध्ये सी. के. खन्ना यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. त्यानंतर गांगुली हा ‘बीसीसीआय’चा ३९वा अध्यक्ष झाला आहे.गांगुलीने बंगाल क्रिकेट संघटनेमध्ये सचिव ते अध्यक्षपर्यंतचा प्रवास केला असल्याने अध्यक्षपदासाठी त्याच्याकडे फक्त नऊ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार, कोणत्याही पदाधिकाऱ्याला सहा वर्षांच्या कार्यकाळानंतर तीन वर्षांचा स्थगित-काळ बंधनकारक असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button